एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व…
काही प्रसंग आयुष्यात असे घडतात की ते आपल्याला निसर्ग, प्रेम, माया आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ शिकवून जातात. आमच्या घरी घडलेला असाच एक छोटासा पण आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव…
एका चिमणीने आमच्या घरात घरटे बांधायला सुरुवात केली. रोज छोट्या-छोट्या काड्या, गवत, धागे आणि जे काही मिळेल ते गोळा करून ती आणि चिमणा प्रेमाने आपले छोटेसे घर उभारत होते. त्यांचे ते कष्ट पाहताना मन भरून यायचे. काही दिवसांनी त्या घरट्यात चार अंडी होती.
मात्र एका रात्री आलेल्या जोरदार वादळाने सगळेच बदलून गेले. घरटे खाली पडले. त्या वेळी चिमणा-चिमणी जवळ नव्हते. त्यांनी तीन अंडी सुरक्षित नेली, पण एक अंडे खालीच राहिले.
माझा मुलगा अवधूत धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला, "आई, आपण या चिमणीच्या बाळाला वाचवूया."
त्याच्या त्या निरागस शब्दांनी आमची धडपड सुरू झाली. आम्ही त्या अंड्याची काळजी घेतली आणि काही दिवसांत त्यातून एक गोंडस पिल्लू बाहेर आले. त्याचे संगोपन, त्याला भरवणे, त्याची काळजी घेणे… नकळत तो आमच्या घरचाच एक सदस्य बनला.
दिवस जात होते. पिल्लू हळूहळू मोठे होत होते. त्याने पंख फडफडवायला आणि थोडे थोडे उडायला सुरुवात केली.
एके दिवशी आम्ही पाहिले की एक चिमणा आणि चिमणी आमच्या घराभोवती, पिंजऱ्याभोवती वारंवार घिरट्या घालत होते. जणू ते आपल्या लेकराला शोधत होते.
मी ही गोष्ट अवधूत आणि माझे पती ॲड. आशिष धर्मपुरीवार यांना सांगितली. तेव्हा अवधूतने मला एक प्रश्न विचारला…
"आई, जर मला तुझ्यापासून कोणी दूर नेलं तर तुला आवडेल का? मग त्या पिल्लालाही त्याच्या आई-बाबांकडे जाऊ दे ना…"
त्या क्षणी माझे डोळे पाणावले. प्रेम म्हणजे फक्त जवळ ठेवणे नसते, तर योग्य वेळी मुक्त करण्याची ताकदही प्रेमातच असते, हे एका लहान मुलाने मला शिकवले.
आम्ही पिंजऱ्याचे दार उघडले… काही क्षणांनी ते पिल्लू आपल्या आई-बाबांसोबत आकाशात भरारी घेत निघून गेले. त्यांना एकत्र उडताना पाहून मनाला जे समाधान मिळाले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मी रोज अनेक बालकांसाठी काम करते. प्रत्येक मुलाला सुरक्षित कुटुंब, प्रेम, माया आणि जिव्हाळा मिळावा यासाठी प्रयत्न करते. त्या दिवशी मात्र निसर्गानेच मला पुन्हा एकदा आठवण करून दिली की'
" आईची माया, लेकराची ओढ आणि कुटुंबाचे प्रेम हे प्रत्येक सजीवासाठी सारखेच असते."
त्या छोट्याशा चिमणीच्या पिल्लाने मला माझ्याच कार्याचा अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगितला. आपण जे काम करतो, त्यातून एखाद्या जीवाला सुरक्षित आयुष्य, कुटुंब आणि आनंद मिळत असेल, तर त्याहून मोठे समाधान दुसरे कोणतेच नाही.
ईश्वरचरणी एकच प्रार्थना…
"प्रत्येक बालकाला त्याचे बालपण, प्रत्येक लेकराला त्याचे कुटुंब आणि प्रत्येक जीवाला सुरक्षित जीवन लाभो. मला आयुष्यभर अशाच संवेदनशीलतेने सेवा करण्याची शक्ती आणि संधी मिळत राहो."
ॲड. क्षमा बासरकर
अध्यक्ष, बाल कल्याण समिती, चंद्रपूर
"माणुसकी फक्त माणसांसाठी नसते; ती प्रत्येक सजीवासाठी असते."