Friday, February 18, 2022

अनुकरण

                                          अनुकरण

माझे लिहिलेले किती जणांना पटेल मला माहिती नाही.पण आता जो ट्रेंड चाललाय ना पुष्पा चा ते पाहून खरंच लिहावेसे वाटले आणि अजून एक निमित्य आहे ते म्हणजे एका भव्य दिव्य अशा व्यक्तीमत्वाची जयंती.......छत्रपती शिवाजी महाराज...... हे नाव जरी घेतलं तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे, असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराज नाव घेतल्यावर आपोआपच अभिमान जागृत होतो.असे आपल्या सगळ्यांचे लाडके असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम त्यांना नमन🙏

अरे काय चाललंय...... तरुण.... तरुणाई आपल्या देशाचे भविष्य....पुढची पिढी.... असे म्हणवणारी आपली पिढी, आपली तरुणाई कुठल्या दिशेला चाललीये याचा कुणाला अंदाजही नसेल.सध्या तर सगळी तरुणाई ही पुष्पा फिल्म च्या संवादाने आणि त्यातल्या गाण्याने तरुणवर्ग वेडावलाय.पुष्पा चा समाज माध्यमांवरचा प्रभाव अतिरेकी आहे.किती...........किती अनुकरण करायचे आणि कुठल्या गोष्टीचे अनुकरण करायचे याचं भान तरुणाईने ठेवायला हवे.सगळीच मुलं मुली तशी नसली तरी 100% पैकी 50% मुलं मुली अश्या गोष्टीचं अनुकरण करतात.

पुष्पा हा चित्रपट अवैधरित्या चंदन तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीवर वर आधारित आहे.कोण कुठला तो पुष्पा जो बेकायदेशीर रीत्या लाल चंदनाची तस्करी करतो.त्यानं त्या चित्रपटात दाखविलेला अविर्भावाचे आपल्या  तरुणाई ला वेड लावून जातो.सगळी तरुण पोरं त्या पुष्पा चे आणि मुली श्रीवल्ली चे अनुकरण करतायेत उद्या तरुण मुलं पोलिसांवर गोळ्या झाडतील,कायदा आणि सुव्यवस्थेच्या  पार चिंध्या उडवतील.स्मगलर आणि दलाल तरुणाईचे आदर्श होतील,आणि असे अनुकरण करणारे आपल्या जीवनाचे तीनतेरा वाजवतील,आदर्श जीवन जगणारे हद्दपार होतील.

      अरे अनुकरण कुणाचं करावं याचं भान तरुणाईने राखलं पाहिजे,आज समाज माध्यमांवर जे ट्रेंड सुरू असेल त्याचे अनुकरण सध्याची तरुणाई करते, तरुणच नव्हे तर काल-परवा तर एक 2 वर्षाचं बाळ tv समोर उभा राहून पुष्पा च्या गाण्यावर नाचत होता, नाचणे, अभिनय हे आपले कला गुणचं आहेत मुलांना शिकवताना पण त्यांच्या आईबाबांनी आदर्श व्यक्तींची उदाहरणं देऊन त्यांचे अनुकरण करा असे मुलांना सांगितले पाहिजे.पण...........पण तरुणाई असल्या लोकांचे(स्मगलर,गुंड) लोकांचे अनुकरण करते तसे न करता तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानले पाहिजे,भगतसिंग यांना आदर्श मानले पाहिजे.तरुणांनी आपले आदर्श आणि चारित्र्य जपले पाहिजे.शिवरायांनी या मातीला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली.शिस्तबद्धता,वेळेचे महत्व, संघटन कौशल्य ह्या सगळ्या गोष्टी आताच्या तरुण तरुणीनं मध्ये असायला हवे.समोर काहीतरी करण्याची जिद्द असायला पाहिजे.जसे माँ जिजाऊंनी शिवबा ला संस्कार दिलेत,त्यांनी शिवबांना परस्त्री ही मातेसमान असते अशी शिकवण त्यांच्या मनात रुजविली, त्यांना घडविले, तसेच  संस्कार सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांमध्ये रुजवायला हवे, जेणे करून समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसेल.महिलांचा सन्मान करायला तरुण शिकतील. म्हणुनच अनुकरण करायचेच असेल तर थोर पुरुषांचे करा जेणेकरून आपल्या देशाला एक चांगली आणि जबाबदार युवा पिढी लाभेल.

                            सह्याद्री च्या छाताडातुन नाद भवानी गाजे,

                          काळजात राहती आमुच्या, रक्तात वाहती राजे,

                                      तुफान गर्जतो,आग ओकतो!

                                              वाघ मराठी माझा!

                                      सन्मान राखतो,जान झोकतो

                                         तुफान मातीचा राजा!

                               "ताजमहाल अगर प्रेम की निशानी है"

                           "तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहानी है"

  श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा


युगप्रवर्तक, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवजन्मोत्सवा निमित्त छत्रपतींना मानाचा मुजरा व सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा #शिवजन्मोत्सव, #जय_शिवराय 🙏🙏

                                        🚩🚩  🙏🙏🙏🙏🚩🚩


ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

८४८४०८२२२४.

Saturday, February 12, 2022

Outlet (expressing emotions)- अभिव्यक्ती

 Outlet (expressing emotions)- अभिव्यक्ती


Outlet आउटलेट म्हणजे अभिव्यक्ती.अभिव्यक्ती म्हणजे विचारांचे प्रकाशन. मनमोकळेपणाने व्यक्त होणे.याद्वारे माणूस आपल्या भावनांना प्रकाश देतो आणि त्याच्या भावनांना रूप देतो पण जर या भावना स्त्री/पुरुष/लहान मुलं/तरुण मुले -मुली व्यक्त करत नसतील तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याचा कुणी विचार केलाय काय? म्हणून व्यक्त होणं किती गरजेचं असतं ! मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्त्वाच्या समायोजनासाठी अभिव्यक्ती हे मुख्य साधन मानले आहे. 


Outlet हे मनुष्याच्या जीवनात किती महत्वाचा आहे,प्रत्येकच व्यक्तीला outlet असणं गरजेचे आहे कारण माणूस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असे नाही.त्याच्या मनात वेगळीच खळबळ असू शकते, जी आपल्यापर्यंत पोचत नसते किंवा तो/ती आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याच्या आड लपविण्याचा प्रयत्न करीत असतो.म्हणूनच माणसाच्या मनाला outlet असायलाच हवे.


आज प्रत्येकाचे जीवन धकाधकीचं झालंय आणि अश्या ह्या धकाधकीच्या जीवनात कुणाकडेच व्यक्त होण्यासाठी वेळ नाही.त्यातल्या त्यात मोबाईल मुळे प्रत्येकांच्या मधला संवाद कमी झालाय, मग त्यात लहान मूलं असो की,मोठी व्यक्ती असो प्रत्येकांमधला संवाद कमी झाल्यामुळे कुणाला व्यक्त व्हावे वाटले तरी ते कुठेतरी राहून जातं आणि मग अश्या स्ट्रेस आणि टेन्शन मुळे नकळत काही चुका झाल्याचं तर त्या मनाला लाऊन घेतल्या जातात.नुसता inlet(suppressing emotions)असून चालणार नाही तर कुठेतरी त्याला outlet(expressing emotions) असायलाचं हवा,नाही तर त्याचा स्फोट व्हायला वेळ लागत नाही.आणि माणूस म्हटलं की, मन आलच,आणि माणूस म्हटलं की,टेन्शन आणि स्ट्रेस हे सुद्धा पार्ट अँड पार्सलचं असतं नाही काय! स्ट्रेस मधून बाहेर निघाले नाही तर डिप्रेशन मध्ये बरेच लोक आत्महत्या हा चुकीचा मार्ग निवडतात आणि होत्याचं नव्हतं करून बसतात  मग ते कुठलाच विचार करत नाहीत की,आपल्या जाण्याने काय परिणाम होऊ शकतात,आपल्यामागे ज्यांना आपण सोडून जातोय त्यांना त्याचा किती त्रास होऊ शकतो. आता मोठ्या मोठ्या सिलिब्रेटींचेच उदाहरण घ्या ना,जसे सुशांत सिंग राजपूत त्याने स्वतः तरुणांना कसे positive असावे अश्या फिल्म मध्ये काम केले पण स्वतः मात्र टोकाचे पाऊल उचलले,काय कमी होती त्याच्या कडे name-fame सगळेच होते पण त्याच्या मनात काय चाललंय हे कुणालाच ठाऊक नव्हते त्याने पण outlet दिला नसावा आणि तो डिप्रेस होऊन त्याने ते पाऊल उचलले असावे,असे बरेच उदाहरणं आहेत जसे की, डॉक्टर शीतल आमटे -करजगी त्या पण motivational बोलायच्या पण त्यांनी पण चुकीचे पाऊल उचलले आणि छोट्याश्या आपल्या बाळाला पोरकं करून गेल्या.मनात साठविले की, त्याचा स्फोट होतोच, भय्यूजी महाराज अध्यात्मिक motivational speech द्यायचे पण त्यांनी देखील तेच पाऊल उचलले हे कितपत योग्य आहे.


जसा एखादा व्यक्ती वरून  शांत दिसत असला तरी त्याच्या आत( मनात)कुठलं वादळ चालू असेल सांगता येत नाही. ते ओळ्खणही ही कठीण असतं.जसे की,बदक वर वर पाण्यात शांत दिसत असला तरी आत पाण्याखाली त्याचे पाय वेगाने चालत असतात वरून शांत फक्त दाखविण्यासाठी असतं पण त्याचे कष्ट त्यालाच माहिती असतात.


मानवी शरीर हे विविध पंचतत्वपासून बनलेलं एक धरणचं आहे. या शरीरात समस्यांची आवक अतिप्रमाणात झाली तर हे मानवरूपी धरण फुटेल की,राहील?लाखो रुपये खर्च करून पाण्यासाठी मोठे धरण बांधले आणि त्याला बाहेर निघण्यासाठी outlet चं दिला नाही तर ते धरण राहील की,फुटेल अर्थातच ते धरण फुटेल कारण त्याला बाहेर निघायला outlet चं नाही.तसेच same to same व्यक्तीच्या बाबतीत घडतं मग ती स्त्री असो,पुरुष असो,मुलगी असो वा मुलगा पण या मनाच्या धरणाला outlet रुपी दरवाजा असणं गरजेचं आहे.


म्हणून आपल्या मनाचे outlet उघडे ठेवा,आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या, आपले दुःख आपल्या माणसांना सांगा.आपल्या अंतर्मनाचे outlet ओपन करण्यासाठी ध्यान साधना, विपश्यना करा आणि शक्य झाल्यास आपल्याला मिळालेलं सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे आपल्याला असलेला स्ट्रेस, टेन्शन, दुःख सगळे ह्या डोळ्यांवाटे अश्रूद्वारे निघून जाऊ द्या,वाहून जाऊ द्या.पंख्याला लटकने,विहिरीत उडी मारणे, विष घेणे, पिस्तूलाच्या गोळीने स्वतःला उडविणे ह्यापेक्षा सोप्प आपल्या डोळ्यांद्वारे आपल्या अश्रूंचा बांध फुटू द्या बघा किती स्ट्रेस फ्री वाटतं ते.म्हणूनच मित्र आणि परिवार हा खूप मोठा outlet आणि आधार असतो त्यांचा आधार नक्की घ्या.


सगळ्यांसोबत हसा, बोला, भांडा, व्यक्त व्हा, मन मोकळं करा.कारण आपुलकीची माणसं मिळायला पण खूप भाग्य लागतं.


ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

अध्यक्ष, बाल कल्याण समिती, चंद्रपूर.

मो नं ८४८४०८२२२४

Friday, February 11, 2022

वयातील बदलणारी दशा

वयातील बदलणारी दशा


 सहज थोडंसं....


तिचं makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं  , सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं ... 

अन् अचानक ती सर्वांना "गबाळी” भासू लागते. 


तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही...  

अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते....!!!!


हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत....   तिचं साधेपणही खुपायला लागतं...


काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...    


पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन पोखरत असते....     !! 


आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?)  लागते.... 

तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., 

तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं  , वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., 

विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं,   सर्वात मिसळणं... सारं सारंच सुंदर वाटू लागतं..!  


पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का????  


खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी होते,  बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ... ,

टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते , सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... 

अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं...!!! 


पुनः तरुण व्हावंसं वाटतं...ती गबाळी, गावंढळ कधीच नसते फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं हे तिला कळून चुकतं अन् “ती कात टाकते”... . 


इतकं सहज सोपं गणित आहे ते....  


मला वाटतं ... नवं

स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ... होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...! 


कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का?? पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का??? 


चंदेरी बट  सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???     


झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..  

मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बरं बदलेल???   


आणि तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का?? 


म्हणूनच बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहेत....

त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, hermonal changes अन् बदलते moods सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...


चाळीशीत तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .. 


पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते ..

ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

चंद्रपूर,8484082224


Saturday, October 9, 2021

नवरंग नवरात्रीचे

 उद्यापासून नवरात्र सुरू होतंय बघा आवडतंय काय  👇🙏    

                                                                    

                           नवरंग नवरात्रीचे 

नवरात्री मध्ये मी स्वतः नवरात्रीचे नवरंगाच्या साड्यांचे फोटो fb वर टाकून रंगाचे महत्व सांगितले होते पण मागील तीन  चार वर्षापूर्वी कोरोना काळात सगळ्यांचा उत्साहाचं मावळला होता पण मागील दोन वर्षांपासून कोरोना कमी झाला आणि  पुन्हा सगळ्यांचा उत्साह वाढलाय. पण तरीही social media चा वापर करताना मात्र अजूनही भीती वाटते कारण दिवसेंदिवस cyber crime आणि hackers मुळे आता फोटोस टाकायची पण भीती वाटते. असो पण मागे फोटोस टाकले होते तर कोणी चांगले आणि कोणी वाईटही बोलले होते.  खंत ही आहे की, स्त्री आहे म्हणून तिला मानसन्मान दयायचा नाही  तिची खिल्ली उडवायची,का बरं तिला प्रत्येक वेळेला कमीच लेखल्या जातं,खरं तर आज स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरीही स्त्रियां वरील अत्याचाराचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही.म्हणजे आज एक बलात्काराची बातमी कानावर पडली की, लगेच दोन दिवसांनी पुन्हा कुठली तरी बलात्काराची बातमी ऐकायला येते जणू काही त्या नराधमांना त्याचे कृत्य पाहून यालाच बळ येतं असं वाटतं आणि अशा बातम्या कानावर पडल्या की, तळपायाची आग मस्तकात जाते.मला ह्यातून हेच सांगावेसे वाटते की,स्त्री ही आज कुठल्या ही क्षेत्रात कमी नाही तर तिचा योग्य मानसन्मान हा व्हायलाच हवा.


खरंय देवीचे नवरात्र आले की,एक प्रकारचा आनंद,उत्साह संचारतो.आपल्या पैकी अनेक जणांना कोणता रंग कधी घालायचा त्याचा वार आणि तारीख याची यादी नवरात्र सुरू व्हायच्या आधीच आपल्याला मिळालेली असते आणि आपण त्याची सगळी तयारी देखील केलेली असते. होय ना...?


चला तर मग या वर्षी आपण सगळेच जण जरा वेगळ्याच नवरंगाची उधळण करूया तुम्हाला हे नवरंग आवडतात काय बघा


नवरंग नवरात्रीचे.


१)पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्याचा.खरंय अजूनही देश पुढारलाय पण स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे ते कुठेतरी थांबायला हवे.


२)दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा जसे मुलगा हा घराचा वंशाचा दिवा असतो तसेच मुलीला पण वशांची पणती म्हणायला काय हरकत आहे.


३)तिसरा रंग आपल्याच मुलीकडे आपण जबाबदारी म्हणून न पहाता एक मौल्यवान व्यक्ती म्हणून नक्कीच पाहू शकतो.जेणेकरून त्या मुलीला पण त्याची जाणीव होता कामा नये की ती एक जबाबदारी आहे.


४)चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करण्याच्या मानसिकतेचा ही मानसिकता प्रत्येकानेच ठेवायला हवी जेणे करून मुलगी ही स्वावलंबी झाली,स्वतः च्या पायांवर उभी झाली की,तिला कुणापुढे झुकण्याची गरज पडणार नाही.


५)पाचवा रंग स्त्रियांवरचे वरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करण्याचा.लोक स्त्रियांवर खूप व्हायात विनोद करतात आणि त्यातून तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तर हे सुध्दा चुकीचे आहे.


६)सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारिरीक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करण्याचा.अगदी खरं आता स्त्री काही कमजोर  राहिली नाही ती सुद्धा प्रत्येक बाबतीत पुढेच आहे आज स्त्री सुध्दा आपली ताकद दाखवू शकते पण शेवटी समाजाने स्त्रीच्या मानसिकतेला कमजोर करून ठेवलंय त्यामुळे ती पुरुषाच्या ताकदीसमोर कमजोर पडते इतके नक्कीच.


७)सातवा रंग स्त्री ही फक्त "स्त्री" नसून ती अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ अशी "व्यक्ती " असे म्हणायला हरकत नाही ती बाहेरचेच काम नाही तर संसार मुलबाळ सांभाळून प्रत्येक गोष्ट करीत असते म्हणूनच तर ती श्रेष्ठ असते.


८)आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी,वेश्या व्यवसाय बालविवाह ह्याबाबतीत अतिशय कठोर कायदे करून लवकरात लवकर त्या पिडितेला न्याय मिळवून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा जेणेकरून पुन्हा असे घृणास्पद कृत्य करताना कोणत्याही पुरुषाने 10 दा विचार नक्कीच करायला हवा.


९)नववा रंग "स्त्री पुरुष समानतेचा"समाजात स्त्रियांना पुरुषाएवढाच मान सन्मान मिळायला हवा.करण अजूनही आपल्या कडे स्त्री ही कर्तृत्ववान झाली असली तरी तिथे भेदभाव हा दिसतोच आहे म्हणून स्त्री पुरुष समानता ही मनापासून स्वीकारायला हवी फक्त दिखाव्याकरिता असली स्त्री पुरुष समानता नको असायला.


शेवटी काय तर आज जर आपण चांगले वागलो तर आपली पुढची पिढी त्याला न्याय देऊ शकेल असे मला तरी वाटते.


आपण खऱ्या रंगासोबतच हे वरील रंग पाळलेत ना तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी, सरस्वती आपल्यावर खऱ्या अर्थाने प्रसन्न होतील, आणि आपल्याला अनेक आशिर्वाद देतील आणि हाच दिवस हा विजयादशमी चा दिवस असेल होय की नाही.मग सगळ्यांकरिता प्रत्येक दिवसच हा"विजयादशमी"असेल...


मग विजयादशमी ला सोने लुटण्याची गरजच भासणार नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच होईल नाही का.मुलीला मुला प्रमाणे वागणूक द्या भेदभाव करू नका.

मुलगी का नकोशी वाटते हो...? जर मुलगीच नसती तर आपल्याला आई,बहीण,बायको आत्या,मावशी, काकू,आजी मिळाली असती का...?बरोबर ना मग खरंच विचार करा स्त्री भ्रूण हत्या थांबवा,महिलांवर अत्याचार थांबवा हीच खरी घटस्थापना आणि नवरात्र असेल सगळ्यांकरिता.


चला तर मग या वर्षीच्या काळातील नवरात्र आणि विजयादशमी वरील नऊ रंगाचा संकल्प करून साजरी करूया.


ऍड. क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

 बाल कल्याण समिति अध्यक्ष, चंद्रपूर

Friday, October 1, 2021

वृद्धापकाळ एक बालपण

                           वृद्धापकाळ एक बालपण


वृद्धापकाळ एक बालपण असेच म्हणेन मी,लहान मुलांना जसे सांभाळावे लागतं तसेच वृद्धांना पण सांभाळावं लागतं म्हणूनच वृद्धापकाळ हे बालपणासारखंच असतं,कारण वृद्धापकाळ हा अगदी लहान मूलांच्या बालपणासारखा होऊन जातो म्हणजे जसं जसं म्हातारपण येतं तसे तसे ते  हट्टी, जिद्दी,चिडचिडे होतात आपण कितीही समजावले तरीही ते लहान मुलांसारखेच वागतात😊ते पुन्हा सुरवातीच्या पायरीवर पोहचतात.जसं बालपण असतं हट्टी, जिद्दी मी म्हणेन तेच खरं असं होऊन जातो वृद्धापकाळ,म्हणजे कुणी मुद्दाम नाही करत पण ते त्या त्या वयात गेले की, ते आपोआप घडत जातं मग मात्र अशावेळेला दोन्ही बाजू मध्ये(नवीन आणि जुन्या पिढी)मध्ये सामंजस्य असणं अत्यंत आवश्यक आहे....वृद्धापकाळ हा जीवनातील विविध अंतरंगातील घटक असून प्रत्येकांना या काळाचा अनुभव घेणे नियतीने निश्चित केलेले आहे. नशिबाने वृद्धत्व जगणे हे अपरिहार्य असले तरी या काळातही जीवन आनंदी, उत्साही व निरामय ठेवणे शक्य असते मात्र, यासाठी विद्यमान पिढीने जेष्ठांचे ऋण स्वीकारण्याचे कर्तव्य बजावले आणि वृद्धांनी देखील आजच्या पिढीला समजून घेतले तर वृध्दाश्रमासारख्या संस्कृतीला स्वीकारण्याची गरजच भासणार नाही. तथापी नव्या पिढीत ऋणांची परतफेड करण्यात दिवसागणिक अभाव जाणवत असल्याने आज वृद्धाश्रम हि काळाची गरज व वृद्धांच्या दुःखांवर पाखरण करणारे मोलाचे निवासस्थान ठरले आहे.  वर्तमान व भावी पिढीने आजच्या या अनुभवातून बोध घेत आदर्श कुटुंब व नीतीवान समाजाच्या निर्मितीचा पाया रचावा. वृद्धांचा आदर - सत्कार हा आपला धर्म असून त्यांचे रक्षण व काळजी घेणे हि आपली संस्कृती आहे. त्यांचा मान - सन्मान समाजातील सर्व घटकांनी राखावा.

वृद्धत्व चांगले जावे हे आपल्या हातात असते. वृद्धत्व म्हणजे विकास आणि म्हातारपण म्हणजे झीज असते. वार्धक्य हे सक्रियपणे जगले पाहिजे. निवृत्त झालो म्हणजे आता उर्वरित जीवनभर आराम करायचा हा दृष्टीकोन ठेवता कामा नये.ज्येष्ठांना माया व प्रेमाची अपेक्षा कुटुंबीयांनी पूर्ण करणे अपेक्षित असतानाच परिस्थितीशी जुळवून घेणे, पुरेसा व्यायाम, व्यस्तता व सामाजिक कामे हे चार मुद्दे ज्येष्ठांच्या सुरक्षित व निरोगी जीवनासाठी उपयोगी ठरतात. नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरतात. अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे (Senior citizen) कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते. एकत्र जेवण, पुरेसा संवाद व काळजी घेण्याची कुटुंबातील सदस्यांची सवय त्यांना आधार देणारी ठरते. एकलकोंडेपणाने नैराश्य वाढते. पण घरातील सर्व सदस्य धावपळीत असले तरी त्यांनी साधलेला संवाद, विचारपूस त्यांना कायम ऊर्जा देणारी ठरते. स्वतःला व्यस्त ठेवणे अत्यंत आवश्यक बाब ठरते. त्यामध्ये सामाजिक काम, करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन, धार्मिक कार्य अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची गरज वृद्धापकाळात असते. याशिवाय समवयस्क मित्रासोबत गप्पाटप्पादेखील तेवढ्याच आनंददायी ठरतात. ही व्यस्तता शारीरिक व्यायाम घडवून आणते तसेच मनाला कामांत गुंतवून ठेवते. कुटुंबासोबत व परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची तयारी असणेदेखील आवश्यक असते. मनाचा उत्साह भरपूर असला तरी शरीर साथ देत नाही. तेव्हा ही स्थिती समजून घेत परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे.तसेच गरजेपुरता व्यायाम केल्यास अन्न पचवणे व शरीर निरोगी राहण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.

वृद्ध लोक देखील कधीतरी तरुणाईची पायरी पार करतच वृद्धापकाळापर्यंत पोहचलेले असतात पण म्हणतात ना त्यांच्या पिढीत नी आपल्या पिढीत फरक असतो तो तोच असतो त्यालाच आताच्या भाषेत(generation gap)म्हणूयात आपण, कारण आताचे तरुणाईचे विचार जरा वेगळे असतात आणि पूर्वीच्या लोकांचे विचार वेगळे असायचे.

आता हेच बघा ना पूर्वीचे लोक रात्री वेळेत झोपतात, सकाळी लवकरच उठतात,फिरायला जाणे,देवासाठी फुले तोडून आणणे,रोज देवाची नित्यनियमित पूजा करणे, मंदिरात जाऊन प्रदक्षिणा मारणे, वेळेत जेवण करणे,म्हातारपणी नवरा बायको ला जास्त मदत करत असतात कारण त्यांना तेव्हा जाणवतं की,आपणच आता एकमेकांचे सोबती असतो,मग झाडांना पाणी घालणे, बायकोला कुठलीही घरात मदत लागत असेल तर ती करणे हे त्यांचे नित्यक्रम सुरू असतात. रोज संध्याकाळी देखील फिरायला जाणे कुणीही रस्त्यात भेटले की,आपुलकीने चौकशी करणे, नमस्कार करणे असे सगळे नेम त्यांचे ठरलेले असतात. तसेच वृद्ध स्त्री देखील अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेताचाच स्वयंपाक करते,उरलेले गरिबाला किंवा गायीला खाऊ घालणे किंवा स्वतः दुसऱ्या दिवशी शिळं खातील पण अन्न वाया जाऊ देणार नाही,तसेच आलेल्या गेलेल्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे पाहुणचार करणे, सगळी सणं साधेपणाने साजरे करणे,पैशाची काटकसर करणे अशी ही जुनी मंडळी ज्याला आपण Senior citizen म्हणतो, पण खरं सांगा हे मी त्यांचे जितके नीत्यनियम सांगितले यात काय गैर आहे हो, सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्याच आहेत पण आजच्या पिढीला ते नको असतं आणि त्यामुळेच जुन्या आणि नवीन पिढी मध्ये वाद होतात.

आजकालची मुलं शिक्षण घेतात आणि आईवडिलांना भारतात ठेवून स्वतः विदेशात जाऊन राहतात पण सांगा फोनवरून, लॅपटॉप वरून आईवडिलांना मुलांचे प्रेम मिळतं काय हो,विदेशात जाऊन खूप पैसे कमवतात आणि इकडे भारतात आई वडिलांना भरपूर पैसे पाठवून मोकळे होतात पण असे केल्याने कर्तव्य संपले नाही काय मुलामुलींचे? "पैशाने प्रेम विकत घेता येत नाही"जिव्हाळा हा जिव्हाळच असतो तो असा ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून किंवा वर्षातून एकदा भेटल्यानी मिळेल काय हो! ज्या वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केले,आपल्याला नवीन कपडे  घेऊन स्वतः फाटक्या बनियन घालून दिवस काढलेत, चप्पल तुटली तर ती शिवून घातली, जुना झालेला चष्मा तुटला तरी नवीन न घेता चिकटवून वापरला,त्या काळी कुठे हॉटेल्स आणि कुठले विकेंड असायचे पण आपल्या आईने आपल्याला वेगवेगळी पदार्थ घरीच करून खाऊ घातलेत ना,उन्हाळा आला की,घरीच पापड, शेवया, घरीच मसाला कुटणे असे सगळे प्रकार करून तिने  आपल्यासाठी मेहनत घेतलेली असतेच ना,म्हणूनच दोन्ही पिढीने सांजयस्याने वागले तर समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारे आणि समोरच्याची काळजी घेणारे जीवन प्रत्येकालाच जगता येईल. आणि कुठेही वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही.आणि ज्यांनी आपल्याला नवी उमेद दिली त्यांची उमेद आपण त्यांच्या वृद्धापकाळात खचू देता कामा नये नाही काय!

                               Happy senior citizens day 🙏

ऍड. क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.




Monday, September 27, 2021

माणूस अजूनही(क्रूरच) रानटीच (रानटीपणाचा/क्रूरपणाचा कळस)

 माझा लेख👇


 माणूस अजूनही(क्रूरच) रानटीच (रानटीपणाचा/क्रूरपणाचा कळस)


काल कन्या दिन होता,तीच कन्या जिला आपण लक्ष्मी, सरस्वती, दुर्गेचे रूप मानतो.काल जिकडे तिकडे कन्या दिनाचे स्टेटस दिसत होते.खूप छान वाटले बघून, पूर्वीसारखे आता कन्येला कोणीच कमी लेखत नाही तर तिचं महत्व पूर्वीपेक्षा बरंच वाढलंय पण.......पण एक सल सतत मनात असते की,इतकं जग पुढे चाललंय मग मुली,स्त्रियांचे महत्व वाढलेले असताना सुद्धा तिच्यावरील अत्याचार मात्र काही केल्या कमी का होत नाही.मानव तेव्हाच का रानटी(क्रूर) होतो जेव्हा,की त्याच मुली,स्त्रियांना आपण लक्ष्मी, दुर्गेचे रूप मानतो.


 मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याच्या बुद्धीचा झालेला विकास आणि त्याने साधलेली प्रगती. सुरुवातीला इतर प्राण्यांप्रमाणेच राहणाऱ्या माणसाने,काळ बदलत गेला तशी उत्क्रांती साधली की, आता तर तो त्याच्या बुद्धीच्या बळावर परग्रहावर जाऊ लागला आहे.


पण, उत्क्रांत झालेला हा माणूस त्याचा रानटीपणा पूर्णपणे विसरलाय का? काही घटना अशा घडून गेल्या आहेत आणि घडत आहेत ज्या पाहून तुम्हाला असं वाटेल की, माणूस अजून रानटीच(क्रूरच) आहे.  हे सगळं ऐकून मन सुन्न नाही तर शरीर आणि मन बधिर व्हायची वेळ आलीये.


किती अश्या निर्भया आणि किती अश्या डॉ प्रियांका आणि अनेक स्त्रिया, मुली अशा अत्याचाराला बळी पडतील आणि पुढेही हे असे होत राहील,स्त्री केव्हा सुरक्षित होईल??


खरंच एक एक घटना कानावर पडल्या की, अंगावर अगदी काटा येतो मग जे भोगत आहे किंवा ज्यांचं भोगून किंवा सहन करून झालंय त्याला काय म्हणू आपण.किती किळसवाणे प्रकार  सुरू आहेत म्हणजे मुलगी असणे म्हणून हसावे की, असे प्रकार घडतात म्हणून रडावे अशी परिस्थिती झालीये.


म्हणजे स्त्री ही पूर्वीपासून सुरक्षित नव्हतीच आणि ती आताही नाहीच आहे,काय हो स्त्रीनेच असा काय गुन्हा केलाय? की,तिच्या नशिबी हे असले भोग भोगायला लागतात. म्हणजे आता मुलीने जन्माला येणेही गुन्हाच म्हणावा लागेल आणि त्याच स्त्रीने मुलींना जन्माला घालणेही गुन्हाच झालंय काय?कारण आपल्याच देशात आपल्याच मुली सुरक्षित नाहीत, पूर्वी स्त्रीने मुलीला जन्माला घातले की, घरचे लोक सतत तिला टोमणे मारत असत पण आता या सगळ्या विकृती बघितल्या की,शरीर मन बधिर होतं आणि नको वाटतं सगळं आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते,


                      "बंदिनी स्त्री ही बंदिनी"


   "हृदययी पान्हा नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी"


 मतिमंद मुलीवर अमानुष बलात्कार,एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्कार,एखाद्या मुलीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळून टाकलं जातं तर कोणावर ऍसिड फेकलं जातं या आणि अशा अनेक  बातम्या एकाच दिवशी आपल्या कानावर पडल्या तर नक्कीच आपल्याला प्रश्न पडेल की, आजच्या युगात महिलांच नक्की स्थान काय ? आज स्त्रिया कुठच्या ही क्षेत्रात मागे नाही मग महिलांबरोबर अत्याचार कमी न होता वाढत का चाललेत?

पुराणकलापासून स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलंय, स्त्रीची अनेक रूप अनादि कालपासून चालत आलीत, मुलगी, पत्नी, माता, मैत्रिण, सुन, सासू, आजी या अनेक नात्यांमधे ती गुंतलीय. एकच स्त्री मधे अनेक नाती स्थानापन्न  झालेली दिसतात, पण एका नात्याची दुसऱ्या नात्याशी सरमिसळ झालेली नसते. प्रत्येक नात्याची एक घट्ट विण विणलेली असते, ती कधीच सुटत नाही, पण याच स्त्रीला समाजकडून अबला, अन्याय सहन करणारी  ही विशेषणं दिली जातात, इतिहासा मधे सुध्दा स्त्रियांची अनेक कर्तुत्व आपल्याला वाचायला मिळतात, झाशीची राणी, जिजाऊ यासारखी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ते स्त्रीयांमधील कर्तुत्व, धैर्य, राजकारणातील डावपेच खेळण्यात ही आजच्या महिला मागे नाहीत पण तरीही मुलगी जन्माला आली की,आजही सुस्कारे टाकले जातात, स्त्री भ्रूण हत्या होते मुलीला जन्म देणाऱ्या मातेच्या मनात ही पहिला प्रश्न हाच येतो की मुलगा झाला असता तर ? मग ती  जन्म देणारी स्त्री आपण ही एक स्त्रीच आहोत हे अलगद विसरते, नातेवाईका च्या डोक्यावर मुलीच ओझं होतं, जन्म झाल्याबरोबर सुरुवात होते ती स्त्रीच्या समाजातील स्थानाला, मुलगी जस-जशी मोठी होत जाते तसंतसे मुलीचे पालक चिंताग्रस्त होत जातात, त्यात त्या मुलीला जर भाऊ असेल तर त्या दोघांमधे फरक केला जातो, मुलीने मुलीसारखाच वागलं पाहिजे हे तिच्या निरागस मनावर बिंबवल जातं, काही काही पालक आपल्या मुलींना मुलींच्याच शाळेत किंवा कॉलेज मधे पाठवणं पसंत करतात, मर्दानी खेळात एकादी मुलगी किती ही तरबेज असली तरी तिला मुला प्रमाणेच प्रोत्साहन मिळतेच असं नाही, मुलींना खेळायला भातुकलीची खेळनीच दिली जातात तिच्या हातात कोणी क्रिकेट ची बॅट नाही ठेवत. लहानपणापासून मुलींना बाळकडू दिलं जाते.पण तरीही आता जग बदललंय पण स्त्रियांवरील अत्याचार काही थांबण्याचे प्रकार कमीच होत नाही आहे.


किती तरी यातना स्त्री सहन करतेच आहे,मागील कित्येक वर्षांपासून अश्या अत्याचाराच्या घटना सतत कानावर पडतातच आहे.पण दिल्ली च्या निर्भया केस पासून बलात्काराच्या केस बद्दल जास्त पडसाद उमटायला लागलेत. म्हणजे सकाळी घरातून निघण्यापासून तर कामावरून रात्री घरी येईपर्यंत स्त्री ही सुरक्षित नाहीच.त्या निर्भया च्या मनात साधा विचारही आला नसेल की, तिच्या सोबत असे काही होऊ शकेल म्हणून बिचारी तिचा काय दोष होता पण अश्या वासनांध नराधमांच्या हाती ती सापडली आणि त्या कुत्र्यांनी तिचे लचके तोडले  पण तिने हिंमतीने सगळ्या यातना सहन करत मृत्यूशी झुंज दिली पण अखेर तिची हिम्मत तुटली आणि ती गेली!दुसरी लक्षात राहण्यासारखी केस म्हणजे डॉ. प्रियांका रेड्डी.डॉ. प्रियांका रेड्डी सोबत झाले ती पण अशीच घटना घडली त्या डॉ. मुलीचा काय दोष ती बिचारी काम आटोपून आपल्या घरी जायला निघाली होती.पण समाजाच्या घाणेरड्या नजरा आणि कलुषित वृत्ती स्त्री ला जगूच देत नाही आणि आधी पासून नजर ठेवुन असलेल्या त्या नराधमांनी आपली भूक भागवून तिला जाळून देखील टाकले पण त्या नराधमांचे थोडे सुद्धा मन पिघळले नाही की,त्या नराधमांना सुद्धा आई, बहीण,मुलगी, बायको असेलच ना, पण असे करताना त्यांना काही सुद्धा वाटले नसेल काय?किती निष्ठुर असतात काही लोक आणि स्त्री ला पुरुषांनी कसे खेळणं केलंय याची जाणीव झाली,मी असे म्हणणार नाही की, सगळेच पुरुष वाईट असतात आज आपल्या शिवाजी महाराजांच्या देशात काही चांगले लोक पण अजूनही आहेतच.पण अश्या घटना वरचेवर सुरूच होत्या.


 आताचीच ताजी घटना घडली ती म्हणजे साकीनाका येथील ती महिला गणपती उत्सवाकरिता आपल्या बहिणीकडे जायला निघाली होती पण तिच्या मनात असे विदारक काही तिच्या सोबत होईल अशी पुसटशी कल्पना देखील आली नसेल पण त्या नराधमाने आपली वासना तर पूर्ण केलीच पण तिचे लचके तोडायचे पण सोडले नाही,ही एक घटना घडून १०/१२ दिवस होत नाही तोच दुसरी घटना कानावर पडली ती म्हणजे डोंबिवली मधली घटना. बघा ना मुलं प्रेमाच्या नावाखाली मुलींना जाळ्यात ओढतात आणि आजकाल व्हिडिओ काढणे म्हणजे नवलच नाही राहिले आहे पण त्या व्हिडिओ च्या नावाखाली त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून एक नाही दोन नाही तब्बल ३० जणांनी तिच्यावर बलात्कार केला असे बातम्यांमध्ये सांगत होते. किती तो रानटी पणा इतकी तळपायाची आग मस्तक गेली ऐकून म्हणजे विकृती इतक्या खालच्या दर्जाला गेलीये शीssss खूपच वाईट वाटलं.पूर्वी लोकांना मुली नको असायच्या पण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतं की, एक तरी मुलगी असायला हवी,मुलगी असणं भाग्याचे समजले जाते पण तिला जन्माला घातल्यावर ती सुरक्षित नसेल आणि तिच्या सोबत असे प्रकार घडणार असतील तर मग काहीच नको वाटतं. किती दिवस मुली अश्या असुरक्षित राहतील,म्हणजे मुली आज शिकून सवरून सुद्धा त्यांच्या नशिबात हे असले घाणेरडे प्रकार होतच आहेत.

मग खरंच कायद्याचे ज्ञान असले तरी एखादेवेळी असं वाटतं की,अशा रानटी, नराधम, वासनांध लोकांना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजे नाही तर जाळून टाकायला हवे.

अरे मोठ्या मुली सोडा पण लहान मुली आणि म्हाताऱ्या बायकांना सुद्धा हे असले वासनांध लोक सोडत नाही,तेव्हा डोकं अजून सटकतं.


                  "भय इथले संपत नाही"


आई वडिलांनी मुलांवर कितीही चांगले संस्कार केले तरी आजकाल मुलं एकमेकांच्या संगतीत राहून बिघडत चालले आहेत आणि इंटरनेट, मोबाईल मुळे मुलांवर वाईट परिणाम होत चालले आहेत मोबाईल, इंटरनेट चे जितके फायदे आहेत त्याच्या दुप्पट तोटेही आहेत.आणि त्यामुळे अश्या किती निष्पाप निर्भया, प्रियांका यांचे बळी जातील काही सांगता येत नाही.पुढे अजून किती निर्भया होणार कोणास ठाऊक. म्हणून सरकारने याकरता ठोस पावले उचलायला हवी आणि अश्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी.तेव्हाच तिला खरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखी होईल.


तसेच मी अजून एक म्हणेन की,आता वेळ आली आहे की,स्त्रीने अबला न राहता सबला व्हायला हवे नाहीतर अश्या किती डॉ प्रियंका आणि निर्भया पुढे होतील सांगता येणार नाही.आणि म्हणून मुलींना शाळेत सक्तीने कराटे हा खेळ compulsary करायला हवा जेणेकरून त्या अश्या प्रवृत्तीना सामोरे जाताना कुठलेही भय तिच्या मनात राहणार नाही.


कोई भी समाज तभी तरक्की करता है जब तक वहा की नारिया सशक्त होती है ,यदि नारी सुरक्षित है तभी हमारा भविष्य भी सुरक्षित है,


अपमान मत करो नारियो का,

इनके बल पर जग चलता हैं,

पुरुष जन्म लेकर तो.....

इनही की गोद मे तो पलता है।


                सौ.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

                सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर

Sunday, July 25, 2021

गुरुपौर्णिमा🙏

                                   गुरुपौर्णिमा


गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते.आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.' या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात.महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो.ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो.

यंदा गुरुपौर्णिमा शुक्रवार, 23 जुलै रोजी आली आहे. या दिवशी मंदिरांमध्ये मोठा उत्सव असतो. तसंच विद्यालयांसह,महाविद्यालय,नृत्य, संगीत, चित्रकला यांसारख्या विविध कलांचे ज्ञान देणाऱ्या गुरुंची भेट घेऊन त्यांना वंदन करतात. यंदा कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणावर गुरु पौर्णिमा साजरी करता येणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे आपल्या गुरुंना शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचा दिवस खास करता येऊ शकतो.कारण कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागलेत आणि २सऱ्या कोरोनाच्या लाटेत बऱ्याच जवळच्या लोकांना गमावल्याने आता तरी सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या संस्कृतीत गुरु-शिष्याची मोठी परंपरा असून गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलं आहे. त्याचबरोबर ग्रंथ, पुस्तके यांनाही गुरुंचा दर्जा आहे. आपल्याला ज्ञानार्जन करणारी, मार्ग दाखवणारी व्यक्ती, तसेच पुस्तकाला देखील गुरुस्थानी मानावे.आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. 

नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला बोलायला लागला की,त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे 'मातृदेवो भव:पितृदेवो भव: असेही म्हटले जाते. तसेच अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. 

शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माचं कारण काय ह्याचेच मार्गदर्शन करणारे गुरु.तसेच नौकरी, व्यवसायात देखील प्रत्येकाला गुरू हे असतातच आणि त्यांचा आपल्याला घडविण्यात खूप मोठा वाटा असतो.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा :महर्षी व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी,अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ,सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील.

 गुरु म्हणजे परीस

आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


करोना आणि गुरुपौर्णिमा

सध्या करोनामुळे शाळा महाविद्यालये बंद होती. आता काही वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या कठीण काळातही अनेक मार्गदर्शक आपल्याला लाभले ज्यामुळे या काळात आपल्याला धीर मिळाला, प्रसंगावधान राखत वाईट परिस्थितीत अनेक जण योग्य दिशा दर्शक ठरले. त्यामुळे काही टक्यांनी का नसो या कठीण परिस्थितीवर मात करणं, भिती घालवणं शक्य झालं आहे. अजुनही काही नियमांत राहणं गरजेचं असलं तरी आपल्यातली भिती कमी होते आहे हे मात्र नक्की. त्यामुळे पदोपदी मार्गदर्शक ठरलेल्या प्रत्येक गुरुला शतश: नमन🙏

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व…

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व… काही प्रसंग आयुष्यात असे घडतात की ते आपल्याला निसर्ग, प्रेम, माया आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ शिकवून जातात. आमच...