Tuesday, October 17, 2023

अन्न हे पूर्णब्रह्म

                                  अन्न हे पूर्णब्रह्म 

                    वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

                     सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

                    जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

                       उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म l

तोंडात घास घेताना श्री हरीचे नाव घ्या, फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन (होम) होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात् परब्रह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर एक यज्ञकर्म आहे म्हणून समजा.असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत.

अन्न हे पूर्णब्रह्म ही म्हण आता हळू हळू लोप पावत चालली असे म्हणायला हरकत नसावी असे मला वाटते. कारण आजकालची तरुण पिढीला सकस आणि पौष्टिक आहार काय हे सांगायला गेले की ते अक्षरशः कानाडोळा करतात. म्हणजे पुरी मोड आलेली मटकीची उसळ ही चिवडा पोह्यासोबत नाश्त्याला दिली जात असत पण आता मुलांना तसलं काही नको असतं त्यांना 2 min मे मॅगी नूडल्स,cheese pasta असले प्रकार हवे असतात.आणि मग काही आया पण लवकर होतं म्हणून तेच बनवून देतात.पण ते सारखं सारखं खाणं मुलांसाठी किती घटक असतं हे कुणालाच कळत नाही.तेच छान आईने मोड आलेल्या कडधान्याचे धिरडे, किंवा अप्पे असे प्रकर मुलांना दिले तर मुलाचं आरोग्यही धोक्यात येणार नाही.छान रोज सात्विक आहार घेतला तर कुठलेही रोगराई होण्याची शक्यता कमी असते.म्हणून पूर्वीचे लोक सकस आणि पौष्टिक अन्न घेत त्यामुळे पूर्वीची पिढी अजूनही ९० पार करत शतक गाठू  शकतात.पण अताची पिढी तर ९वी -१० वीतल्या मुलाला देखील heart attack चा धोका आहे. आजकालची मुलं जीम लावतात पौष्टिक आहार घेण्याऐवजी त्या जीम मध्ये कुठलसं पावडर देतात ते मुलं घेतात.आणि आपल्या आयुष्यातले क्षण कमी करून घेतात. नियमित योगासन आणि पौष्टिक कडधान्य युक्त आहारचे सेवन जर सगळ्यांनी सुरू केले तर बऱ्याच गोष्टींना आळा बसेल व आयुष्य वाढेल असे माझे मत आहे.

आपली संस्कृती विदेशी लोक अनुकरण करतात आणि भारतीय लोक विदेशी लोकांचे अनुकरण करतात.भारतीय कृषी संस्कृतीचा अनिवार्य घटक असलेल्या ‘तृणधान्या’ला जागतिक स्तरावर आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयुक्तराष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष जागतिक धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघात यासंबंधीचा ठराव मांडला होता. पिकांना तृणधान्य म्हणून प्राधान्य मिळाले की जागतिक स्तरावर यासंबंधीची जागृती अधिक वाढणार आहे. तृणधान्याच्या पिकांकडे अधिक लक्ष वाढावे म्हणून भारतानेही २०१८ हे वर्ष राष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरी केले होते. यापूर्वी देखील कृषिशास्त्रज्ञ प्रा.एम.एस. स्वामिनाथन यांनीही ‘पौष्टिक धान्य’ हा शब्द प्रचारात आणला होता. अन्नधान्य भारतीयांचे प्रमुख अन्न म्हणून तृणधान्य ओळखले जात होते. मात्र, काही वर्षांपासून त्यात घट होत आहे. आपण आपले धान्य विसरून पाश्चात्त्य धान्याच्या मागे लागलो आणि विविध व्याधींना बळी पडलो. आता याच व्याधींपासून मुक्तता हवी असेल तर तृणधान्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य आहे. हे सत्य जगाने ओळखले म्हणून जगातील विविध देशांमध्ये तृणधान्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. ‘युनेस्को’ने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त तृणधान्याची उत्पत्ती, स्थित्यंतरे, त्याच्यापुढील आव्हाने याचा आढावा घेणे गरजेचे आहे.

सध्या ‘फास्ट फूड’चा जमाना असल्याने तृणधान्याला महत्त्व दिले जात नाही. आजकालची बच्चा कंपनी आणि तरुण वर्ग तर नुसताच त्या फास्ट फूड च्या मागे असतो. म्हणजे त्यांना सकस भोजनापेक्षाही एक पिझ्झा, पास्ता, नुडल्स असे प्रकार खाल्ले की, ते त्यांचे संपुर्ण रात्रीचा आहार झाला असे समजतात.परंतु या स्ट्रीट फूड वाल्यांनी देखील असे तृणधान्य , कडधान्य वापरून काहीतरी innovative recipe बनवायला हवी जेणेकरून मुले,तरुण वर्ग आवडीने खातील व त्याचा कंटाळा करणार नाही आणि पौष्टिक पदार्थ पोटात जातील.भारतात तृणधान्याच्या लागवडीखालील क्षेत्रांत सातत्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘युनेस्को’ने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य (मिलेट्स) वर्ष जाहीर केले आहे. केंद्र सरकारनेही त्या दृष्टीने सजग धोरणे आखण्याची सुरुवात केली आहे.

जगातील प्रमुख संस्कृतींपैकी प्रत्येक संस्कृतीतील लोकांनी पोषणासाठी तृणधान्यांचा प्रामुख्याने वापर केला आहे. प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होत असताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. तृणधान्यांमध्ये तीन प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. कोंडा म्हणजे तृणधान्याच्या सर्वांत बाहेरील आवरण असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक (फायबर) मुबलक प्रमाणात असतात. यातील दुसरा घटक असलेल्या अंकुरापासून दुसरे पीक उगवू शकते. या अंकुरामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश असतो. एन्डोस्पर्म हा तृणधान्याचा मुख्य खाद्यपुरवठा करणारा घटक आणि तृणधान्याचा सर्वाधिक भाग याने व्यापलेला असतो. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात स्टार्च आणि प्रथिने असतात. यामधील स्टार्च हा शरीराला ऊर्जा पुरवतो. तृणधान्यांमध्ये असलेले लॅक्टिक अँसिड मोठ्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करते. या जीवाणूंमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते; पोषणाचे शोषण अधिक चांगल्या रीतीने होते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. भात व गहू या पिकांच्या तुलनेत तृणधान्यांमध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिज पदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो आणि आयुर्मानही वाढते. यासाठी आहारामध्ये तृणधान्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. तृणधान्य हे खाणाऱ्यासाठी अतिशय उत्तम असे मानले जाते. त्याचप्रमाणे खनिजे, जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्सचा यात भरपूर प्रमाणात समावेश असतो. हे धान्य रोग होण्यापासून बचाव करतेच; परंतु रोग झाल्यानंतरदेखील शरीराची झीज भरून काढण्याचे मोलाचे काम करते.

सरकारी शाळांमध्ये मुलांना आठवड्यातून एकदा तृणधान्य दिले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना करणे आवश्यक आहे. पौष्टिक तृणधान्य लागवडीसाठी कृषी विद्यापीठांमार्फत विविध योजना तयार करायला हव्यात; त्याचबरोबर उद्योगांना या व्यवसायाशी निगडित करायला हवे. शेतकऱ्यांसाठी राज्य व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे. पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे, पौष्टिक तृणधान्य पिकांची मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, पौष्टिक तृणधान्य पिकांचा लोकांच्या आहारात वापर वाढवणे, त्यासाठी प्रचार व प्रसार करणे, तृणधान्याचा विविध योजनांत समावेश करणे या गोष्टी केल्या पाहिजेत. सरकार जेव्हा काही करील, तेव्हा करील; परंतु सामान्य नागरिकांनीही आता पुढे येण्याची गरज आहे. ‘मी आठवड्यातून एकदा तरी तृणधान्याचे- कडधान्याचे सेवन करीन,’ अशी प्रतिज्ञा केली पाहिजे, तरच तृणधान्य वाचेल. पर्यायाने माणूस वाचेल यात शंका नाही.

ॲड क्षमा आशिष धर्मपूरीवार 

अध्यक्ष बाल कल्याण समिती चंद्रपूर

8484082224.

Tuesday, January 24, 2023

बेटीया तो बेटीया होती हैं l

 


                        बेटीया तो बेटीया होती हैं l


सगळ्यांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

असे म्हणतात की, ज्या घरात मुलींचा जन्म होतो, त्या घरात सौभाग्यही जन्माला येते.होय,त्यांच्यामुळेच घरात चमक येते, ही म्हण मुलींसाठी प्रसिद्धचं आहे.  आजकाल डॉ. हे त्या गर्भवती महिलांच्या पतींना विचारतात तेव्हा ते मुलीची इच्छा व्यक्त करतात.  वास्तविक, मुली एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या हाताळण्यास सक्षम असतात.  तेही मुलांपेक्षा जास्त भावनिक असतात.  खरंच, आईसाठी जगातील सर्वात मोठा दिवस असतो जेव्हा ती मुलीला जन्म देते.  गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात कन्या दिवस (बेटी दिवस) म्हणून वेगवेगळे दिवस साजरे केले जात आहेत.  मुली न सांगता प्रत्येक भावना समजून घेतात.  मुलींचे कौतुक करण्यासाठी, तुम्ही तिला कुठल्याही माध्यमातून तिचे कौतुक करू शकता. 

 मुलीचा जन्म ही ईश्वराची देणगी असते, असे म्हणतात.  आणि त्या सुदैवाने  मिळतात.  पण अनेक कुटुंबे इतकी दुर्दैवी आहेत की, जिथे मुलींना ओझं समजलं जातं.आणि काही ठिकाणी मुलींना जन्मापूर्वीच मारलं जातं.  पण ज्यांना मुली नाहीत, त्यांना कोणीतरी त्यांचे महत्त्व विचारावे.

एखादी मुलगी तुमच्या मांडीत बसू शकणार नाही इतकी मोठी असू शकते पण ती तुमच्या हृदयात बसू शकणार नाही इतकी मोठी कधीच असू शकत नाही.कोण म्हणतं मुलींना दोन हृदयं नसतात, नवऱ्याच्या उंबरठ्यावर बसलेल्या बापाच्या मुलीला विचारा.मुली खूप भावूक असतात, त्यांचे हृदय खूप कोमल असते.  ती उत्कट तसेच दृढनिश्चयी असते, अशा परिस्थितीत, प्रत्येक आईचे कर्तव्य आहे की,त्यांनी आपल्या मुलींना नेहमीच प्रेरणा द्यावी जेणेकरून त्या निर्भयपणे आणि समजूतदारपणे जीवनातील अडचणींचा सामना करू शकतील.  हे काम तुम्ही तुमच्या मुलीवर छानशी चारोळी लिहून, मुलीवर काही सुंदर ओळी लिहून, तिच्यासोबत शेअर करू शकता, जेणेकरून तिच्या प्रोत्साहनात कोणतीही कमतरता राहू नये.  आई आणि  मुलीचं नातं खूप खास असतं,आणि बाबांची ते ती परीच असते.

मुलीला जन्म दिल्याने स्त्रीच्या कुशीत एक निष्पाप मूलच येत नाही, तर एक लहान मुलगी, उद्याची स्त्री आणि तिच्या भूतकाळाचा संघर्ष आणि भविष्याची स्वप्ने आणि आशा असतात. मुलांपेक्षा मुलींमध्ये एक गुण जास्त असतो असे विज्ञानही मानते. मुलगे एक घर चालवतात, मुली दोन घरांना स्वर्ग बनवतात. मुलगी ही अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत तुम्ही हसता, स्वप्न पाहता आणि मनापासून प्रेम करता. एक पिता जोपर्यंत त्याच्या सर्वात महत्वाच्या निर्मितीचे म्हणजेच त्याच्या मुलीचे यश पाहत नाही तोपर्यंत तो अपूर्ण असतो. जिथे माणुसकी मरते तिथे मुलींचा गर्भातच गळा दाबला जातो. मुलीचा जन्म थांबवू नका, मुलगी वाचवा, मुलीला शिक्षित करा, तिचा जन्म साजरा करा. समाजाला शिक्षित करायचं असेल तर आधी मुलींना शिक्षित करा.ती शिक्षित झाली तर तिची पुढची पिढी शिक्षित होईल म्हणून शिक्षण आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी जसे व्हायचे तसे आता सर्रास बालविवाह होण्यास सुरुवात झालीय पण हे कुठेतरी थांबायला हवे नाहीतर आपला देश कुठे चाललाय याचा नेमचं नाही.अशी भारताची तरुण पिढी भरकटत गेली तर देशाचे भविष्य काय राहील.म्हणूनच


बेटीया तो बेटीया होती हैं l हर मां-बाप की जान होती हैं l

लक्ष्मी का वरदान होती हैं बेटीयां, सरस्वती का मान होती हैं बेटीयां, धरती पर भगवान हैं बेटीयां l

जरूरी नहीं रौशनी चिरागों से ही हो, बेटीयां भी घरो में उजाला करती हैं।

बेटीयों को जैसे संस्कार मिलेंगे, वैसे ही समाज का निर्माण होगा

घर में रहते हुए ग़ैरों की तरह होती हैं बेटीयां, धान के पौधों की तरह होती हैं बेटीया l

लाख गुलाब लगा लो तुम अपने आंगन में, जीवन में खुशबू तो बेटीया ही लाती हैं l

पराया होकर भी कभी पराई नही होती बेटीया शायद इसलिए कभी पिता से हंसकर बेटीयो की बिदाई नही होती।

एक मीठी सी मुस्कान हैं बेटीया यह सच है कि मेहमान हैं बेटीया, उस घर की पहचान बनने चली जिस घर से अनजान हैं बेटीया।

बेटीयो की हर ख्वाहिश पूरी नहीं होती, फिर भी बेटीया कभी भी अधूरी नहीं होती।

बेटियां सब के मुक़द्दर में कहां होती हैं, घर खुदा को जो पसंद आये वहां होती हैं बेटीया।

विज्ञान भी मानता है कि बेटीयों में बेटों से एक गुण ज्यादा होता है।

बेटे तो एक घर चलाते हैं, बेटीयां तो दो-दो घरों को स्वर्ग बनाती हैं।

इसीलिये 

बेटीया तो बेटीया होती हैं l हर मां-बाप की जान होती हैं 

ॲड क्षमा बासरकर - धर्मपुरीवार

बाल कल्याण समिती अध्यक्ष चंद्रपूर

8484082224





Saturday, April 30, 2022

मोबाईल फ्री ऑफलाईन आई- बाबा पाहिजे

 मोबाईल फ्री ऑफलाईन आई- बाबा पाहिजे


हा जो लेख लिहिलाय मी, तो किती जणांना पटेल माहिती नाही पण plz कुणी वाईट वाटून वाईट comment करू नये.🙏


खरचं मुलं पण बिचारे बेजार होतात हो,कधी कधी म्हणजे बघा ना आई वडील मुलांना म्हणतात," मोबाईल जास्त वापरू नका रे पोरांनो" पण  स्वतः मात्र आई वडील देखील किती त्या मोबाईल मध्ये मग्न झालेले असतात.त्यांचे त्यांना पण कळत नाही. म्हणूनच ह्या मोबाईल च्या दूनियेतून बाहेर निघून मुलांना वेळ देणं नितांत गरजेचं झालयं. मोबाईल जितका फायदेशीर म्हणता येईल त्याच्या दहापट तोटेही आहेत आणि ह्या मागील 3 वर्षाच्या कोरोना काळात तर आई बाबा, मुलगा, मुलगी, एवढेच काय तर ज्या आजी आजोबांना android mobile वापरता येतो असे आजी आजोबा सगळेच मोबाईल च्या आहारी गेले  म्हणायला हरकत नाही.कारण कोरोना काळात  घरातून बाहेर पडता येत नव्हते, मुलांना पण मागील 3 वर्षापासून शाळाही online च करावी लागली होती त्यामुळे करमणूक म्हणजे सगळ्यांसाठी मोबाईल. फक्त ह्यातले काहीच असे आजी आजोबा थोडेतरी टीव्ही च्या आणि मराठी serials मध्ये मग्न होते पण मुलं आणि आई बाबा मात्र मोबाईल मध्ये होतेच आणि तीच सवय पुढेही चालू राहिली आहे.


म्हणूनच कोरोना संपल्यावर जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मात्र मुलांना खूप जड गेलं नवीन नवीन शाळेतलं ऑफलाईन शिक्षण. आणि मोबाईल मध्ये busy झालेले आईबाबांना पाहून देखील. कारण आजकालचे आई बाबा पण मोबाईल मध्ये खूप मग्न असतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


लहान मुलांना खूप कळतं कारण आजकालची पिढी खूपच sharp mind असते. त्यांना मोबाईल फोन आवडत असला तरी त्यांना खेळणे सुद्धा तेवढेच प्रिय असते.ते थोड्यावेळ मोबाईल घेवून राहतील पण बोर झाले की,लगेच खेळण्यासाठी हट्ट ही करतील. अश्यावेळेला ला पोरं आई बाबांच्या मागे,माझ्याशी खेळा म्हणुन मागे लागतात पण तेव्हा आई बाबा मोबाईल मध्ये busy असेल तर मग ते लक्षही देत नाही तेव्हा त्यांना जाणवतं की, आपले आई बाबाच तर मोबाईल मध्ये busy आहेत मग आपणही मोबाईल घेवू बसतात कारण आपण त्यांच्या समोर जसे वागू तेही आपले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

म्हणून कुठेतरी वाचले की, इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’  आवडते यावर निबंध लिहायला दिला.


प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले. मात्र एका राहुल नावाच्या मुलाने त्याच्या मजकुरात शिर्षक लिहीले - "ऑफलाइन आई...!" 


त्यावरून मला click झाले आणि लिहावेसे वाटले फक्त आईचं का?तर बाबा पण ऑफलाईन पाहिजे कारण आईवडील दोघांचाही वेळ मुलांसाठी मौल्यवान असतो.आणि मग तो पिल्लू आपल्या आई बाबांना म्हणेल,


मला "आई" "बाबा" दोघेही ऑफलाईन हवे,जेणेकरून त्यांना"माझ्यासाठी" आणि माझ्या घरच्यांसाठी "मोबाईल" पेक्षा  "जास्त वेळ" असेल.

मला "आई""बाबा" पाहिजे, पण "ऑफ लाईन" पाहिजे.

मला असे "आई -बाबा"हवे जे मोबाइल चा कमी वापर करतील आणि किट्टी पार्टी किंवा भिसीमध्ये वेळ देण्याऐवजी मला जास्त वेळ देवून माझ्यासोबत सगळीकडे जाण्यासाठी ते उत्सुक असतील.


आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नकोस ग, घरी काहीही बनव.ते आम्ही आनंदाने खाऊ. 


जेंव्हा मी रात्री झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ते एक गोष्ट सांगुन मला झोपवतील.अशी मुलांची ईच्छा असते.


आणि म्हणूनच ते म्हणतील,

मला फक्त मोबाईल फ्री ऑफलाइन "आई" "बाबा"पाहिजे.

खरचं पण आता ते गरजेचे झालंय सगळ्यांनी आधुनिक रहावं पण आपल्या मुलांचे बालपण जपणं ही तितकेच गरजेचे आहे, कारण ते बालपण एकदा निघून गेले की ते परत कधीच येणार नाही...🙏🙏🙏


सौ. क्षमा आशिष धर्मपुरिवार (बासरकर)

बा. क.स. अध्यक्ष.चंद्रपूर 8484082224

Friday, February 18, 2022

अनुकरण

                                          अनुकरण

माझे लिहिलेले किती जणांना पटेल मला माहिती नाही.पण आता जो ट्रेंड चाललाय ना पुष्पा चा ते पाहून खरंच लिहावेसे वाटले आणि अजून एक निमित्य आहे ते म्हणजे एका भव्य दिव्य अशा व्यक्तीमत्वाची जयंती.......छत्रपती शिवाजी महाराज...... हे नाव जरी घेतलं तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे, असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराज नाव घेतल्यावर आपोआपच अभिमान जागृत होतो.असे आपल्या सगळ्यांचे लाडके असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम त्यांना नमन🙏

अरे काय चाललंय...... तरुण.... तरुणाई आपल्या देशाचे भविष्य....पुढची पिढी.... असे म्हणवणारी आपली पिढी, आपली तरुणाई कुठल्या दिशेला चाललीये याचा कुणाला अंदाजही नसेल.सध्या तर सगळी तरुणाई ही पुष्पा फिल्म च्या संवादाने आणि त्यातल्या गाण्याने तरुणवर्ग वेडावलाय.पुष्पा चा समाज माध्यमांवरचा प्रभाव अतिरेकी आहे.किती...........किती अनुकरण करायचे आणि कुठल्या गोष्टीचे अनुकरण करायचे याचं भान तरुणाईने ठेवायला हवे.सगळीच मुलं मुली तशी नसली तरी 100% पैकी 50% मुलं मुली अश्या गोष्टीचं अनुकरण करतात.

पुष्पा हा चित्रपट अवैधरित्या चंदन तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीवर वर आधारित आहे.कोण कुठला तो पुष्पा जो बेकायदेशीर रीत्या लाल चंदनाची तस्करी करतो.त्यानं त्या चित्रपटात दाखविलेला अविर्भावाचे आपल्या  तरुणाई ला वेड लावून जातो.सगळी तरुण पोरं त्या पुष्पा चे आणि मुली श्रीवल्ली चे अनुकरण करतायेत उद्या तरुण मुलं पोलिसांवर गोळ्या झाडतील,कायदा आणि सुव्यवस्थेच्या  पार चिंध्या उडवतील.स्मगलर आणि दलाल तरुणाईचे आदर्श होतील,आणि असे अनुकरण करणारे आपल्या जीवनाचे तीनतेरा वाजवतील,आदर्श जीवन जगणारे हद्दपार होतील.

      अरे अनुकरण कुणाचं करावं याचं भान तरुणाईने राखलं पाहिजे,आज समाज माध्यमांवर जे ट्रेंड सुरू असेल त्याचे अनुकरण सध्याची तरुणाई करते, तरुणच नव्हे तर काल-परवा तर एक 2 वर्षाचं बाळ tv समोर उभा राहून पुष्पा च्या गाण्यावर नाचत होता, नाचणे, अभिनय हे आपले कला गुणचं आहेत मुलांना शिकवताना पण त्यांच्या आईबाबांनी आदर्श व्यक्तींची उदाहरणं देऊन त्यांचे अनुकरण करा असे मुलांना सांगितले पाहिजे.पण...........पण तरुणाई असल्या लोकांचे(स्मगलर,गुंड) लोकांचे अनुकरण करते तसे न करता तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानले पाहिजे,भगतसिंग यांना आदर्श मानले पाहिजे.तरुणांनी आपले आदर्श आणि चारित्र्य जपले पाहिजे.शिवरायांनी या मातीला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली.शिस्तबद्धता,वेळेचे महत्व, संघटन कौशल्य ह्या सगळ्या गोष्टी आताच्या तरुण तरुणीनं मध्ये असायला हवे.समोर काहीतरी करण्याची जिद्द असायला पाहिजे.जसे माँ जिजाऊंनी शिवबा ला संस्कार दिलेत,त्यांनी शिवबांना परस्त्री ही मातेसमान असते अशी शिकवण त्यांच्या मनात रुजविली, त्यांना घडविले, तसेच  संस्कार सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांमध्ये रुजवायला हवे, जेणे करून समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसेल.महिलांचा सन्मान करायला तरुण शिकतील. म्हणुनच अनुकरण करायचेच असेल तर थोर पुरुषांचे करा जेणेकरून आपल्या देशाला एक चांगली आणि जबाबदार युवा पिढी लाभेल.

                            सह्याद्री च्या छाताडातुन नाद भवानी गाजे,

                          काळजात राहती आमुच्या, रक्तात वाहती राजे,

                                      तुफान गर्जतो,आग ओकतो!

                                              वाघ मराठी माझा!

                                      सन्मान राखतो,जान झोकतो

                                         तुफान मातीचा राजा!

                               "ताजमहाल अगर प्रेम की निशानी है"

                           "तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहानी है"

  श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा


युगप्रवर्तक, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवजन्मोत्सवा निमित्त छत्रपतींना मानाचा मुजरा व सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा #शिवजन्मोत्सव, #जय_शिवराय 🙏🙏

                                        🚩🚩  🙏🙏🙏🙏🚩🚩


ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

८४८४०८२२२४.

Saturday, February 12, 2022

Outlet (expressing emotions)- अभिव्यक्ती

 Outlet (expressing emotions)- अभिव्यक्ती


Outlet आउटलेट म्हणजे अभिव्यक्ती.अभिव्यक्ती म्हणजे विचारांचे प्रकाशन. मनमोकळेपणाने व्यक्त होणे.याद्वारे माणूस आपल्या भावनांना प्रकाश देतो आणि त्याच्या भावनांना रूप देतो पण जर या भावना स्त्री/पुरुष/लहान मुलं/तरुण मुले -मुली व्यक्त करत नसतील तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याचा कुणी विचार केलाय काय? म्हणून व्यक्त होणं किती गरजेचं असतं ! मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्त्वाच्या समायोजनासाठी अभिव्यक्ती हे मुख्य साधन मानले आहे. 


Outlet हे मनुष्याच्या जीवनात किती महत्वाचा आहे,प्रत्येकच व्यक्तीला outlet असणं गरजेचे आहे कारण माणूस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असे नाही.त्याच्या मनात वेगळीच खळबळ असू शकते, जी आपल्यापर्यंत पोचत नसते किंवा तो/ती आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याच्या आड लपविण्याचा प्रयत्न करीत असतो.म्हणूनच माणसाच्या मनाला outlet असायलाच हवे.


आज प्रत्येकाचे जीवन धकाधकीचं झालंय आणि अश्या ह्या धकाधकीच्या जीवनात कुणाकडेच व्यक्त होण्यासाठी वेळ नाही.त्यातल्या त्यात मोबाईल मुळे प्रत्येकांच्या मधला संवाद कमी झालाय, मग त्यात लहान मूलं असो की,मोठी व्यक्ती असो प्रत्येकांमधला संवाद कमी झाल्यामुळे कुणाला व्यक्त व्हावे वाटले तरी ते कुठेतरी राहून जातं आणि मग अश्या स्ट्रेस आणि टेन्शन मुळे नकळत काही चुका झाल्याचं तर त्या मनाला लाऊन घेतल्या जातात.नुसता inlet(suppressing emotions)असून चालणार नाही तर कुठेतरी त्याला outlet(expressing emotions) असायलाचं हवा,नाही तर त्याचा स्फोट व्हायला वेळ लागत नाही.आणि माणूस म्हटलं की, मन आलच,आणि माणूस म्हटलं की,टेन्शन आणि स्ट्रेस हे सुद्धा पार्ट अँड पार्सलचं असतं नाही काय! स्ट्रेस मधून बाहेर निघाले नाही तर डिप्रेशन मध्ये बरेच लोक आत्महत्या हा चुकीचा मार्ग निवडतात आणि होत्याचं नव्हतं करून बसतात  मग ते कुठलाच विचार करत नाहीत की,आपल्या जाण्याने काय परिणाम होऊ शकतात,आपल्यामागे ज्यांना आपण सोडून जातोय त्यांना त्याचा किती त्रास होऊ शकतो. आता मोठ्या मोठ्या सिलिब्रेटींचेच उदाहरण घ्या ना,जसे सुशांत सिंग राजपूत त्याने स्वतः तरुणांना कसे positive असावे अश्या फिल्म मध्ये काम केले पण स्वतः मात्र टोकाचे पाऊल उचलले,काय कमी होती त्याच्या कडे name-fame सगळेच होते पण त्याच्या मनात काय चाललंय हे कुणालाच ठाऊक नव्हते त्याने पण outlet दिला नसावा आणि तो डिप्रेस होऊन त्याने ते पाऊल उचलले असावे,असे बरेच उदाहरणं आहेत जसे की, डॉक्टर शीतल आमटे -करजगी त्या पण motivational बोलायच्या पण त्यांनी पण चुकीचे पाऊल उचलले आणि छोट्याश्या आपल्या बाळाला पोरकं करून गेल्या.मनात साठविले की, त्याचा स्फोट होतोच, भय्यूजी महाराज अध्यात्मिक motivational speech द्यायचे पण त्यांनी देखील तेच पाऊल उचलले हे कितपत योग्य आहे.


जसा एखादा व्यक्ती वरून  शांत दिसत असला तरी त्याच्या आत( मनात)कुठलं वादळ चालू असेल सांगता येत नाही. ते ओळ्खणही ही कठीण असतं.जसे की,बदक वर वर पाण्यात शांत दिसत असला तरी आत पाण्याखाली त्याचे पाय वेगाने चालत असतात वरून शांत फक्त दाखविण्यासाठी असतं पण त्याचे कष्ट त्यालाच माहिती असतात.


मानवी शरीर हे विविध पंचतत्वपासून बनलेलं एक धरणचं आहे. या शरीरात समस्यांची आवक अतिप्रमाणात झाली तर हे मानवरूपी धरण फुटेल की,राहील?लाखो रुपये खर्च करून पाण्यासाठी मोठे धरण बांधले आणि त्याला बाहेर निघण्यासाठी outlet चं दिला नाही तर ते धरण राहील की,फुटेल अर्थातच ते धरण फुटेल कारण त्याला बाहेर निघायला outlet चं नाही.तसेच same to same व्यक्तीच्या बाबतीत घडतं मग ती स्त्री असो,पुरुष असो,मुलगी असो वा मुलगा पण या मनाच्या धरणाला outlet रुपी दरवाजा असणं गरजेचं आहे.


म्हणून आपल्या मनाचे outlet उघडे ठेवा,आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या, आपले दुःख आपल्या माणसांना सांगा.आपल्या अंतर्मनाचे outlet ओपन करण्यासाठी ध्यान साधना, विपश्यना करा आणि शक्य झाल्यास आपल्याला मिळालेलं सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे आपल्याला असलेला स्ट्रेस, टेन्शन, दुःख सगळे ह्या डोळ्यांवाटे अश्रूद्वारे निघून जाऊ द्या,वाहून जाऊ द्या.पंख्याला लटकने,विहिरीत उडी मारणे, विष घेणे, पिस्तूलाच्या गोळीने स्वतःला उडविणे ह्यापेक्षा सोप्प आपल्या डोळ्यांद्वारे आपल्या अश्रूंचा बांध फुटू द्या बघा किती स्ट्रेस फ्री वाटतं ते.म्हणूनच मित्र आणि परिवार हा खूप मोठा outlet आणि आधार असतो त्यांचा आधार नक्की घ्या.


सगळ्यांसोबत हसा, बोला, भांडा, व्यक्त व्हा, मन मोकळं करा.कारण आपुलकीची माणसं मिळायला पण खूप भाग्य लागतं.


ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

अध्यक्ष, बाल कल्याण समिती, चंद्रपूर.

मो नं ८४८४०८२२२४

Friday, February 11, 2022

वयातील बदलणारी दशा

वयातील बदलणारी दशा


 सहज थोडंसं....


तिचं makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं  , सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं ... 

अन् अचानक ती सर्वांना "गबाळी” भासू लागते. 


तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही...  

अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते....!!!!


हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत....   तिचं साधेपणही खुपायला लागतं...


काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...    


पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन पोखरत असते....     !! 


आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?)  लागते.... 

तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., 

तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं  , वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., 

विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं,   सर्वात मिसळणं... सारं सारंच सुंदर वाटू लागतं..!  


पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का????  


खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी होते,  बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ... ,

टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते , सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... 

अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं...!!! 


पुनः तरुण व्हावंसं वाटतं...ती गबाळी, गावंढळ कधीच नसते फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं हे तिला कळून चुकतं अन् “ती कात टाकते”... . 


इतकं सहज सोपं गणित आहे ते....  


मला वाटतं ... नवं

स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ... होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...! 


कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का?? पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का??? 


चंदेरी बट  सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???     


झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..  

मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बरं बदलेल???   


आणि तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का?? 


म्हणूनच बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहेत....

त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, hermonal changes अन् बदलते moods सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...


चाळीशीत तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .. 


पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते ..

ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

चंद्रपूर,8484082224


Saturday, October 9, 2021

नवरंग नवरात्रीचे

 उद्यापासून नवरात्र सुरू होतंय बघा आवडतंय काय  👇🙏    

                                                                    

                           नवरंग नवरात्रीचे 

नवरात्री मध्ये मी स्वतः नवरात्रीचे नवरंगाच्या साड्यांचे फोटो fb वर टाकून रंगाचे महत्व सांगितले होते पण मागील तीन  चार वर्षापूर्वी कोरोना काळात सगळ्यांचा उत्साहाचं मावळला होता पण मागील दोन वर्षांपासून कोरोना कमी झाला आणि  पुन्हा सगळ्यांचा उत्साह वाढलाय. पण तरीही social media चा वापर करताना मात्र अजूनही भीती वाटते कारण दिवसेंदिवस cyber crime आणि hackers मुळे आता फोटोस टाकायची पण भीती वाटते. असो पण मागे फोटोस टाकले होते तर कोणी चांगले आणि कोणी वाईटही बोलले होते.  खंत ही आहे की, स्त्री आहे म्हणून तिला मानसन्मान दयायचा नाही  तिची खिल्ली उडवायची,का बरं तिला प्रत्येक वेळेला कमीच लेखल्या जातं,खरं तर आज स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरीही स्त्रियां वरील अत्याचाराचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही.म्हणजे आज एक बलात्काराची बातमी कानावर पडली की, लगेच दोन दिवसांनी पुन्हा कुठली तरी बलात्काराची बातमी ऐकायला येते जणू काही त्या नराधमांना त्याचे कृत्य पाहून यालाच बळ येतं असं वाटतं आणि अशा बातम्या कानावर पडल्या की, तळपायाची आग मस्तकात जाते.मला ह्यातून हेच सांगावेसे वाटते की,स्त्री ही आज कुठल्या ही क्षेत्रात कमी नाही तर तिचा योग्य मानसन्मान हा व्हायलाच हवा.


खरंय देवीचे नवरात्र आले की,एक प्रकारचा आनंद,उत्साह संचारतो.आपल्या पैकी अनेक जणांना कोणता रंग कधी घालायचा त्याचा वार आणि तारीख याची यादी नवरात्र सुरू व्हायच्या आधीच आपल्याला मिळालेली असते आणि आपण त्याची सगळी तयारी देखील केलेली असते. होय ना...?


चला तर मग या वर्षी आपण सगळेच जण जरा वेगळ्याच नवरंगाची उधळण करूया तुम्हाला हे नवरंग आवडतात काय बघा


नवरंग नवरात्रीचे.


१)पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्याचा.खरंय अजूनही देश पुढारलाय पण स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे ते कुठेतरी थांबायला हवे.


२)दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा जसे मुलगा हा घराचा वंशाचा दिवा असतो तसेच मुलीला पण वशांची पणती म्हणायला काय हरकत आहे.


३)तिसरा रंग आपल्याच मुलीकडे आपण जबाबदारी म्हणून न पहाता एक मौल्यवान व्यक्ती म्हणून नक्कीच पाहू शकतो.जेणेकरून त्या मुलीला पण त्याची जाणीव होता कामा नये की ती एक जबाबदारी आहे.


४)चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करण्याच्या मानसिकतेचा ही मानसिकता प्रत्येकानेच ठेवायला हवी जेणे करून मुलगी ही स्वावलंबी झाली,स्वतः च्या पायांवर उभी झाली की,तिला कुणापुढे झुकण्याची गरज पडणार नाही.


५)पाचवा रंग स्त्रियांवरचे वरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करण्याचा.लोक स्त्रियांवर खूप व्हायात विनोद करतात आणि त्यातून तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तर हे सुध्दा चुकीचे आहे.


६)सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारिरीक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करण्याचा.अगदी खरं आता स्त्री काही कमजोर  राहिली नाही ती सुद्धा प्रत्येक बाबतीत पुढेच आहे आज स्त्री सुध्दा आपली ताकद दाखवू शकते पण शेवटी समाजाने स्त्रीच्या मानसिकतेला कमजोर करून ठेवलंय त्यामुळे ती पुरुषाच्या ताकदीसमोर कमजोर पडते इतके नक्कीच.


७)सातवा रंग स्त्री ही फक्त "स्त्री" नसून ती अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ अशी "व्यक्ती " असे म्हणायला हरकत नाही ती बाहेरचेच काम नाही तर संसार मुलबाळ सांभाळून प्रत्येक गोष्ट करीत असते म्हणूनच तर ती श्रेष्ठ असते.


८)आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी,वेश्या व्यवसाय बालविवाह ह्याबाबतीत अतिशय कठोर कायदे करून लवकरात लवकर त्या पिडितेला न्याय मिळवून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा जेणेकरून पुन्हा असे घृणास्पद कृत्य करताना कोणत्याही पुरुषाने 10 दा विचार नक्कीच करायला हवा.


९)नववा रंग "स्त्री पुरुष समानतेचा"समाजात स्त्रियांना पुरुषाएवढाच मान सन्मान मिळायला हवा.करण अजूनही आपल्या कडे स्त्री ही कर्तृत्ववान झाली असली तरी तिथे भेदभाव हा दिसतोच आहे म्हणून स्त्री पुरुष समानता ही मनापासून स्वीकारायला हवी फक्त दिखाव्याकरिता असली स्त्री पुरुष समानता नको असायला.


शेवटी काय तर आज जर आपण चांगले वागलो तर आपली पुढची पिढी त्याला न्याय देऊ शकेल असे मला तरी वाटते.


आपण खऱ्या रंगासोबतच हे वरील रंग पाळलेत ना तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी, सरस्वती आपल्यावर खऱ्या अर्थाने प्रसन्न होतील, आणि आपल्याला अनेक आशिर्वाद देतील आणि हाच दिवस हा विजयादशमी चा दिवस असेल होय की नाही.मग सगळ्यांकरिता प्रत्येक दिवसच हा"विजयादशमी"असेल...


मग विजयादशमी ला सोने लुटण्याची गरजच भासणार नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच होईल नाही का.मुलीला मुला प्रमाणे वागणूक द्या भेदभाव करू नका.

मुलगी का नकोशी वाटते हो...? जर मुलगीच नसती तर आपल्याला आई,बहीण,बायको आत्या,मावशी, काकू,आजी मिळाली असती का...?बरोबर ना मग खरंच विचार करा स्त्री भ्रूण हत्या थांबवा,महिलांवर अत्याचार थांबवा हीच खरी घटस्थापना आणि नवरात्र असेल सगळ्यांकरिता.


चला तर मग या वर्षीच्या काळातील नवरात्र आणि विजयादशमी वरील नऊ रंगाचा संकल्प करून साजरी करूया.


ऍड. क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

 बाल कल्याण समिति अध्यक्ष, चंद्रपूर

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व…

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व… काही प्रसंग आयुष्यात असे घडतात की ते आपल्याला निसर्ग, प्रेम, माया आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ शिकवून जातात. आमच...