Friday, October 1, 2021

वृद्धापकाळ एक बालपण

                           वृद्धापकाळ एक बालपण


वृद्धापकाळ एक बालपण असेच म्हणेन मी,लहान मुलांना जसे सांभाळावे लागतं तसेच वृद्धांना पण सांभाळावं लागतं म्हणूनच वृद्धापकाळ हे बालपणासारखंच असतं,कारण वृद्धापकाळ हा अगदी लहान मूलांच्या बालपणासारखा होऊन जातो म्हणजे जसं जसं म्हातारपण येतं तसे तसे ते  हट्टी, जिद्दी,चिडचिडे होतात आपण कितीही समजावले तरीही ते लहान मुलांसारखेच वागतात😊ते पुन्हा सुरवातीच्या पायरीवर पोहचतात.जसं बालपण असतं हट्टी, जिद्दी मी म्हणेन तेच खरं असं होऊन जातो वृद्धापकाळ,म्हणजे कुणी मुद्दाम नाही करत पण ते त्या त्या वयात गेले की, ते आपोआप घडत जातं मग मात्र अशावेळेला दोन्ही बाजू मध्ये(नवीन आणि जुन्या पिढी)मध्ये सामंजस्य असणं अत्यंत आवश्यक आहे....वृद्धापकाळ हा जीवनातील विविध अंतरंगातील घटक असून प्रत्येकांना या काळाचा अनुभव घेणे नियतीने निश्चित केलेले आहे. नशिबाने वृद्धत्व जगणे हे अपरिहार्य असले तरी या काळातही जीवन आनंदी, उत्साही व निरामय ठेवणे शक्य असते मात्र, यासाठी विद्यमान पिढीने जेष्ठांचे ऋण स्वीकारण्याचे कर्तव्य बजावले आणि वृद्धांनी देखील आजच्या पिढीला समजून घेतले तर वृध्दाश्रमासारख्या संस्कृतीला स्वीकारण्याची गरजच भासणार नाही. तथापी नव्या पिढीत ऋणांची परतफेड करण्यात दिवसागणिक अभाव जाणवत असल्याने आज वृद्धाश्रम हि काळाची गरज व वृद्धांच्या दुःखांवर पाखरण करणारे मोलाचे निवासस्थान ठरले आहे.  वर्तमान व भावी पिढीने आजच्या या अनुभवातून बोध घेत आदर्श कुटुंब व नीतीवान समाजाच्या निर्मितीचा पाया रचावा. वृद्धांचा आदर - सत्कार हा आपला धर्म असून त्यांचे रक्षण व काळजी घेणे हि आपली संस्कृती आहे. त्यांचा मान - सन्मान समाजातील सर्व घटकांनी राखावा.

वृद्धत्व चांगले जावे हे आपल्या हातात असते. वृद्धत्व म्हणजे विकास आणि म्हातारपण म्हणजे झीज असते. वार्धक्य हे सक्रियपणे जगले पाहिजे. निवृत्त झालो म्हणजे आता उर्वरित जीवनभर आराम करायचा हा दृष्टीकोन ठेवता कामा नये.ज्येष्ठांना माया व प्रेमाची अपेक्षा कुटुंबीयांनी पूर्ण करणे अपेक्षित असतानाच परिस्थितीशी जुळवून घेणे, पुरेसा व्यायाम, व्यस्तता व सामाजिक कामे हे चार मुद्दे ज्येष्ठांच्या सुरक्षित व निरोगी जीवनासाठी उपयोगी ठरतात. नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरतात. अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे (Senior citizen) कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते. एकत्र जेवण, पुरेसा संवाद व काळजी घेण्याची कुटुंबातील सदस्यांची सवय त्यांना आधार देणारी ठरते. एकलकोंडेपणाने नैराश्य वाढते. पण घरातील सर्व सदस्य धावपळीत असले तरी त्यांनी साधलेला संवाद, विचारपूस त्यांना कायम ऊर्जा देणारी ठरते. स्वतःला व्यस्त ठेवणे अत्यंत आवश्यक बाब ठरते. त्यामध्ये सामाजिक काम, करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन, धार्मिक कार्य अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची गरज वृद्धापकाळात असते. याशिवाय समवयस्क मित्रासोबत गप्पाटप्पादेखील तेवढ्याच आनंददायी ठरतात. ही व्यस्तता शारीरिक व्यायाम घडवून आणते तसेच मनाला कामांत गुंतवून ठेवते. कुटुंबासोबत व परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची तयारी असणेदेखील आवश्यक असते. मनाचा उत्साह भरपूर असला तरी शरीर साथ देत नाही. तेव्हा ही स्थिती समजून घेत परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे.तसेच गरजेपुरता व्यायाम केल्यास अन्न पचवणे व शरीर निरोगी राहण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.

वृद्ध लोक देखील कधीतरी तरुणाईची पायरी पार करतच वृद्धापकाळापर्यंत पोहचलेले असतात पण म्हणतात ना त्यांच्या पिढीत नी आपल्या पिढीत फरक असतो तो तोच असतो त्यालाच आताच्या भाषेत(generation gap)म्हणूयात आपण, कारण आताचे तरुणाईचे विचार जरा वेगळे असतात आणि पूर्वीच्या लोकांचे विचार वेगळे असायचे.

आता हेच बघा ना पूर्वीचे लोक रात्री वेळेत झोपतात, सकाळी लवकरच उठतात,फिरायला जाणे,देवासाठी फुले तोडून आणणे,रोज देवाची नित्यनियमित पूजा करणे, मंदिरात जाऊन प्रदक्षिणा मारणे, वेळेत जेवण करणे,म्हातारपणी नवरा बायको ला जास्त मदत करत असतात कारण त्यांना तेव्हा जाणवतं की,आपणच आता एकमेकांचे सोबती असतो,मग झाडांना पाणी घालणे, बायकोला कुठलीही घरात मदत लागत असेल तर ती करणे हे त्यांचे नित्यक्रम सुरू असतात. रोज संध्याकाळी देखील फिरायला जाणे कुणीही रस्त्यात भेटले की,आपुलकीने चौकशी करणे, नमस्कार करणे असे सगळे नेम त्यांचे ठरलेले असतात. तसेच वृद्ध स्त्री देखील अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेताचाच स्वयंपाक करते,उरलेले गरिबाला किंवा गायीला खाऊ घालणे किंवा स्वतः दुसऱ्या दिवशी शिळं खातील पण अन्न वाया जाऊ देणार नाही,तसेच आलेल्या गेलेल्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे पाहुणचार करणे, सगळी सणं साधेपणाने साजरे करणे,पैशाची काटकसर करणे अशी ही जुनी मंडळी ज्याला आपण Senior citizen म्हणतो, पण खरं सांगा हे मी त्यांचे जितके नीत्यनियम सांगितले यात काय गैर आहे हो, सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्याच आहेत पण आजच्या पिढीला ते नको असतं आणि त्यामुळेच जुन्या आणि नवीन पिढी मध्ये वाद होतात.

आजकालची मुलं शिक्षण घेतात आणि आईवडिलांना भारतात ठेवून स्वतः विदेशात जाऊन राहतात पण सांगा फोनवरून, लॅपटॉप वरून आईवडिलांना मुलांचे प्रेम मिळतं काय हो,विदेशात जाऊन खूप पैसे कमवतात आणि इकडे भारतात आई वडिलांना भरपूर पैसे पाठवून मोकळे होतात पण असे केल्याने कर्तव्य संपले नाही काय मुलामुलींचे? "पैशाने प्रेम विकत घेता येत नाही"जिव्हाळा हा जिव्हाळच असतो तो असा ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून किंवा वर्षातून एकदा भेटल्यानी मिळेल काय हो! ज्या वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केले,आपल्याला नवीन कपडे  घेऊन स्वतः फाटक्या बनियन घालून दिवस काढलेत, चप्पल तुटली तर ती शिवून घातली, जुना झालेला चष्मा तुटला तरी नवीन न घेता चिकटवून वापरला,त्या काळी कुठे हॉटेल्स आणि कुठले विकेंड असायचे पण आपल्या आईने आपल्याला वेगवेगळी पदार्थ घरीच करून खाऊ घातलेत ना,उन्हाळा आला की,घरीच पापड, शेवया, घरीच मसाला कुटणे असे सगळे प्रकार करून तिने  आपल्यासाठी मेहनत घेतलेली असतेच ना,म्हणूनच दोन्ही पिढीने सांजयस्याने वागले तर समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारे आणि समोरच्याची काळजी घेणारे जीवन प्रत्येकालाच जगता येईल. आणि कुठेही वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही.आणि ज्यांनी आपल्याला नवी उमेद दिली त्यांची उमेद आपण त्यांच्या वृद्धापकाळात खचू देता कामा नये नाही काय!

                               Happy senior citizens day 🙏

ऍड. क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.




Monday, September 27, 2021

माणूस अजूनही(क्रूरच) रानटीच (रानटीपणाचा/क्रूरपणाचा कळस)

 माझा लेख👇


 माणूस अजूनही(क्रूरच) रानटीच (रानटीपणाचा/क्रूरपणाचा कळस)


काल कन्या दिन होता,तीच कन्या जिला आपण लक्ष्मी, सरस्वती, दुर्गेचे रूप मानतो.काल जिकडे तिकडे कन्या दिनाचे स्टेटस दिसत होते.खूप छान वाटले बघून, पूर्वीसारखे आता कन्येला कोणीच कमी लेखत नाही तर तिचं महत्व पूर्वीपेक्षा बरंच वाढलंय पण.......पण एक सल सतत मनात असते की,इतकं जग पुढे चाललंय मग मुली,स्त्रियांचे महत्व वाढलेले असताना सुद्धा तिच्यावरील अत्याचार मात्र काही केल्या कमी का होत नाही.मानव तेव्हाच का रानटी(क्रूर) होतो जेव्हा,की त्याच मुली,स्त्रियांना आपण लक्ष्मी, दुर्गेचे रूप मानतो.


 मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याच्या बुद्धीचा झालेला विकास आणि त्याने साधलेली प्रगती. सुरुवातीला इतर प्राण्यांप्रमाणेच राहणाऱ्या माणसाने,काळ बदलत गेला तशी उत्क्रांती साधली की, आता तर तो त्याच्या बुद्धीच्या बळावर परग्रहावर जाऊ लागला आहे.


पण, उत्क्रांत झालेला हा माणूस त्याचा रानटीपणा पूर्णपणे विसरलाय का? काही घटना अशा घडून गेल्या आहेत आणि घडत आहेत ज्या पाहून तुम्हाला असं वाटेल की, माणूस अजून रानटीच(क्रूरच) आहे.  हे सगळं ऐकून मन सुन्न नाही तर शरीर आणि मन बधिर व्हायची वेळ आलीये.


किती अश्या निर्भया आणि किती अश्या डॉ प्रियांका आणि अनेक स्त्रिया, मुली अशा अत्याचाराला बळी पडतील आणि पुढेही हे असे होत राहील,स्त्री केव्हा सुरक्षित होईल??


खरंच एक एक घटना कानावर पडल्या की, अंगावर अगदी काटा येतो मग जे भोगत आहे किंवा ज्यांचं भोगून किंवा सहन करून झालंय त्याला काय म्हणू आपण.किती किळसवाणे प्रकार  सुरू आहेत म्हणजे मुलगी असणे म्हणून हसावे की, असे प्रकार घडतात म्हणून रडावे अशी परिस्थिती झालीये.


म्हणजे स्त्री ही पूर्वीपासून सुरक्षित नव्हतीच आणि ती आताही नाहीच आहे,काय हो स्त्रीनेच असा काय गुन्हा केलाय? की,तिच्या नशिबी हे असले भोग भोगायला लागतात. म्हणजे आता मुलीने जन्माला येणेही गुन्हाच म्हणावा लागेल आणि त्याच स्त्रीने मुलींना जन्माला घालणेही गुन्हाच झालंय काय?कारण आपल्याच देशात आपल्याच मुली सुरक्षित नाहीत, पूर्वी स्त्रीने मुलीला जन्माला घातले की, घरचे लोक सतत तिला टोमणे मारत असत पण आता या सगळ्या विकृती बघितल्या की,शरीर मन बधिर होतं आणि नको वाटतं सगळं आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते,


                      "बंदिनी स्त्री ही बंदिनी"


   "हृदययी पान्हा नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी"


 मतिमंद मुलीवर अमानुष बलात्कार,एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्कार,एखाद्या मुलीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळून टाकलं जातं तर कोणावर ऍसिड फेकलं जातं या आणि अशा अनेक  बातम्या एकाच दिवशी आपल्या कानावर पडल्या तर नक्कीच आपल्याला प्रश्न पडेल की, आजच्या युगात महिलांच नक्की स्थान काय ? आज स्त्रिया कुठच्या ही क्षेत्रात मागे नाही मग महिलांबरोबर अत्याचार कमी न होता वाढत का चाललेत?

पुराणकलापासून स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलंय, स्त्रीची अनेक रूप अनादि कालपासून चालत आलीत, मुलगी, पत्नी, माता, मैत्रिण, सुन, सासू, आजी या अनेक नात्यांमधे ती गुंतलीय. एकच स्त्री मधे अनेक नाती स्थानापन्न  झालेली दिसतात, पण एका नात्याची दुसऱ्या नात्याशी सरमिसळ झालेली नसते. प्रत्येक नात्याची एक घट्ट विण विणलेली असते, ती कधीच सुटत नाही, पण याच स्त्रीला समाजकडून अबला, अन्याय सहन करणारी  ही विशेषणं दिली जातात, इतिहासा मधे सुध्दा स्त्रियांची अनेक कर्तुत्व आपल्याला वाचायला मिळतात, झाशीची राणी, जिजाऊ यासारखी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ते स्त्रीयांमधील कर्तुत्व, धैर्य, राजकारणातील डावपेच खेळण्यात ही आजच्या महिला मागे नाहीत पण तरीही मुलगी जन्माला आली की,आजही सुस्कारे टाकले जातात, स्त्री भ्रूण हत्या होते मुलीला जन्म देणाऱ्या मातेच्या मनात ही पहिला प्रश्न हाच येतो की मुलगा झाला असता तर ? मग ती  जन्म देणारी स्त्री आपण ही एक स्त्रीच आहोत हे अलगद विसरते, नातेवाईका च्या डोक्यावर मुलीच ओझं होतं, जन्म झाल्याबरोबर सुरुवात होते ती स्त्रीच्या समाजातील स्थानाला, मुलगी जस-जशी मोठी होत जाते तसंतसे मुलीचे पालक चिंताग्रस्त होत जातात, त्यात त्या मुलीला जर भाऊ असेल तर त्या दोघांमधे फरक केला जातो, मुलीने मुलीसारखाच वागलं पाहिजे हे तिच्या निरागस मनावर बिंबवल जातं, काही काही पालक आपल्या मुलींना मुलींच्याच शाळेत किंवा कॉलेज मधे पाठवणं पसंत करतात, मर्दानी खेळात एकादी मुलगी किती ही तरबेज असली तरी तिला मुला प्रमाणेच प्रोत्साहन मिळतेच असं नाही, मुलींना खेळायला भातुकलीची खेळनीच दिली जातात तिच्या हातात कोणी क्रिकेट ची बॅट नाही ठेवत. लहानपणापासून मुलींना बाळकडू दिलं जाते.पण तरीही आता जग बदललंय पण स्त्रियांवरील अत्याचार काही थांबण्याचे प्रकार कमीच होत नाही आहे.


किती तरी यातना स्त्री सहन करतेच आहे,मागील कित्येक वर्षांपासून अश्या अत्याचाराच्या घटना सतत कानावर पडतातच आहे.पण दिल्ली च्या निर्भया केस पासून बलात्काराच्या केस बद्दल जास्त पडसाद उमटायला लागलेत. म्हणजे सकाळी घरातून निघण्यापासून तर कामावरून रात्री घरी येईपर्यंत स्त्री ही सुरक्षित नाहीच.त्या निर्भया च्या मनात साधा विचारही आला नसेल की, तिच्या सोबत असे काही होऊ शकेल म्हणून बिचारी तिचा काय दोष होता पण अश्या वासनांध नराधमांच्या हाती ती सापडली आणि त्या कुत्र्यांनी तिचे लचके तोडले  पण तिने हिंमतीने सगळ्या यातना सहन करत मृत्यूशी झुंज दिली पण अखेर तिची हिम्मत तुटली आणि ती गेली!दुसरी लक्षात राहण्यासारखी केस म्हणजे डॉ. प्रियांका रेड्डी.डॉ. प्रियांका रेड्डी सोबत झाले ती पण अशीच घटना घडली त्या डॉ. मुलीचा काय दोष ती बिचारी काम आटोपून आपल्या घरी जायला निघाली होती.पण समाजाच्या घाणेरड्या नजरा आणि कलुषित वृत्ती स्त्री ला जगूच देत नाही आणि आधी पासून नजर ठेवुन असलेल्या त्या नराधमांनी आपली भूक भागवून तिला जाळून देखील टाकले पण त्या नराधमांचे थोडे सुद्धा मन पिघळले नाही की,त्या नराधमांना सुद्धा आई, बहीण,मुलगी, बायको असेलच ना, पण असे करताना त्यांना काही सुद्धा वाटले नसेल काय?किती निष्ठुर असतात काही लोक आणि स्त्री ला पुरुषांनी कसे खेळणं केलंय याची जाणीव झाली,मी असे म्हणणार नाही की, सगळेच पुरुष वाईट असतात आज आपल्या शिवाजी महाराजांच्या देशात काही चांगले लोक पण अजूनही आहेतच.पण अश्या घटना वरचेवर सुरूच होत्या.


 आताचीच ताजी घटना घडली ती म्हणजे साकीनाका येथील ती महिला गणपती उत्सवाकरिता आपल्या बहिणीकडे जायला निघाली होती पण तिच्या मनात असे विदारक काही तिच्या सोबत होईल अशी पुसटशी कल्पना देखील आली नसेल पण त्या नराधमाने आपली वासना तर पूर्ण केलीच पण तिचे लचके तोडायचे पण सोडले नाही,ही एक घटना घडून १०/१२ दिवस होत नाही तोच दुसरी घटना कानावर पडली ती म्हणजे डोंबिवली मधली घटना. बघा ना मुलं प्रेमाच्या नावाखाली मुलींना जाळ्यात ओढतात आणि आजकाल व्हिडिओ काढणे म्हणजे नवलच नाही राहिले आहे पण त्या व्हिडिओ च्या नावाखाली त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून एक नाही दोन नाही तब्बल ३० जणांनी तिच्यावर बलात्कार केला असे बातम्यांमध्ये सांगत होते. किती तो रानटी पणा इतकी तळपायाची आग मस्तक गेली ऐकून म्हणजे विकृती इतक्या खालच्या दर्जाला गेलीये शीssss खूपच वाईट वाटलं.पूर्वी लोकांना मुली नको असायच्या पण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतं की, एक तरी मुलगी असायला हवी,मुलगी असणं भाग्याचे समजले जाते पण तिला जन्माला घातल्यावर ती सुरक्षित नसेल आणि तिच्या सोबत असे प्रकार घडणार असतील तर मग काहीच नको वाटतं. किती दिवस मुली अश्या असुरक्षित राहतील,म्हणजे मुली आज शिकून सवरून सुद्धा त्यांच्या नशिबात हे असले घाणेरडे प्रकार होतच आहेत.

मग खरंच कायद्याचे ज्ञान असले तरी एखादेवेळी असं वाटतं की,अशा रानटी, नराधम, वासनांध लोकांना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजे नाही तर जाळून टाकायला हवे.

अरे मोठ्या मुली सोडा पण लहान मुली आणि म्हाताऱ्या बायकांना सुद्धा हे असले वासनांध लोक सोडत नाही,तेव्हा डोकं अजून सटकतं.


                  "भय इथले संपत नाही"


आई वडिलांनी मुलांवर कितीही चांगले संस्कार केले तरी आजकाल मुलं एकमेकांच्या संगतीत राहून बिघडत चालले आहेत आणि इंटरनेट, मोबाईल मुळे मुलांवर वाईट परिणाम होत चालले आहेत मोबाईल, इंटरनेट चे जितके फायदे आहेत त्याच्या दुप्पट तोटेही आहेत.आणि त्यामुळे अश्या किती निष्पाप निर्भया, प्रियांका यांचे बळी जातील काही सांगता येत नाही.पुढे अजून किती निर्भया होणार कोणास ठाऊक. म्हणून सरकारने याकरता ठोस पावले उचलायला हवी आणि अश्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी.तेव्हाच तिला खरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखी होईल.


तसेच मी अजून एक म्हणेन की,आता वेळ आली आहे की,स्त्रीने अबला न राहता सबला व्हायला हवे नाहीतर अश्या किती डॉ प्रियंका आणि निर्भया पुढे होतील सांगता येणार नाही.आणि म्हणून मुलींना शाळेत सक्तीने कराटे हा खेळ compulsary करायला हवा जेणेकरून त्या अश्या प्रवृत्तीना सामोरे जाताना कुठलेही भय तिच्या मनात राहणार नाही.


कोई भी समाज तभी तरक्की करता है जब तक वहा की नारिया सशक्त होती है ,यदि नारी सुरक्षित है तभी हमारा भविष्य भी सुरक्षित है,


अपमान मत करो नारियो का,

इनके बल पर जग चलता हैं,

पुरुष जन्म लेकर तो.....

इनही की गोद मे तो पलता है।


                सौ.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

                सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर

Sunday, July 25, 2021

गुरुपौर्णिमा🙏

                                   गुरुपौर्णिमा


गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते.आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे 'गुरुपौर्णिमा.' या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात.महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो.ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो.

यंदा गुरुपौर्णिमा शुक्रवार, 23 जुलै रोजी आली आहे. या दिवशी मंदिरांमध्ये मोठा उत्सव असतो. तसंच विद्यालयांसह,महाविद्यालय,नृत्य, संगीत, चित्रकला यांसारख्या विविध कलांचे ज्ञान देणाऱ्या गुरुंची भेट घेऊन त्यांना वंदन करतात. यंदा कोरोना संकटामुळे मोठ्या प्रमाणावर गुरु पौर्णिमा साजरी करता येणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे आपल्या गुरुंना शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचा दिवस खास करता येऊ शकतो.कारण कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते तोच तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागलेत आणि २सऱ्या कोरोनाच्या लाटेत बऱ्याच जवळच्या लोकांना गमावल्याने आता तरी सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या संस्कृतीत गुरु-शिष्याची मोठी परंपरा असून गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलं आहे. त्याचबरोबर ग्रंथ, पुस्तके यांनाही गुरुंचा दर्जा आहे. आपल्याला ज्ञानार्जन करणारी, मार्ग दाखवणारी व्यक्ती, तसेच पुस्तकाला देखील गुरुस्थानी मानावे.आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. 

नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला बोलायला लागला की,त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे 'मातृदेवो भव:पितृदेवो भव: असेही म्हटले जाते. तसेच अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. 

शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माचं कारण काय ह्याचेच मार्गदर्शन करणारे गुरु.तसेच नौकरी, व्यवसायात देखील प्रत्येकाला गुरू हे असतातच आणि त्यांचा आपल्याला घडविण्यात खूप मोठा वाटा असतो.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा :महर्षी व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी,अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ,सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील.

 गुरु म्हणजे परीस

आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


करोना आणि गुरुपौर्णिमा

सध्या करोनामुळे शाळा महाविद्यालये बंद होती. आता काही वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या कठीण काळातही अनेक मार्गदर्शक आपल्याला लाभले ज्यामुळे या काळात आपल्याला धीर मिळाला, प्रसंगावधान राखत वाईट परिस्थितीत अनेक जण योग्य दिशा दर्शक ठरले. त्यामुळे काही टक्यांनी का नसो या कठीण परिस्थितीवर मात करणं, भिती घालवणं शक्य झालं आहे. अजुनही काही नियमांत राहणं गरजेचं असलं तरी आपल्यातली भिती कमी होते आहे हे मात्र नक्की. त्यामुळे पदोपदी मार्गदर्शक ठरलेल्या प्रत्येक गुरुला शतश: नमन🙏

Friday, March 26, 2021

बालपण - एक फुलपाखरु, इंटरनेट च्या चक्रव्यूहात अडकलेलं

    (बालपण - एक फुलपाखरु, इंटरनेट च्या चक्रव्यूहात अडकलेलं)


बालपण म्हणजे स्वछंदी फुलपाखरू,

बालपण म्हणजे निस्वार्थ प्रेम,

बालपण म्हणजे निस्वार्थ हसणं,

बालपण म्हणजे निस्वार्थ जगणं, 

बालपण म्हणजे एक सुंदर अनुभूती.

Thank u अवधूत बेटा खरंच तू आज आम्हा(आई-बाबा) दोघांनाही बालपणीची आठवण करून दिलीस.दिवसभर आम्ही व्यस्त असतो त्यामुळे अवधुतला वेळ द्यायला आम्ही ऑफीस मधून घरी आल्यानंतर आणि सुट्टीचे दिवस असतात. तर काल रात्री त्यालाच सुचलं आणि म्हणाला आई बाबा आपण मी सांगेल तसा गेम खेळूया  काय?आम्ही म्हटले "कुठला गेम खेळायचा बेटा"तर तो म्हणाला की,आपण आज चित्र काढून बघण्याची स्पर्धा करूया तिघेपण जण, पहिल्यांदा नको वाटले कारण आता किती तरी दिवस झाले असतील चित्र काढणे वगैरे सगळं दूरच राहिलंय पण त्याच्या आनंदासाठी आम्ही दोघेही तयार झालो त्याने आम्हला सांगितले की,आई बाबा मी वेळ देणार त्यावेळेत चित्र काढा कुठलही चित्र काढा तुम्हाला जे वाटतं ते, तोही काढणार होताच आमच्या सोबत चित्र,तो तर आता न शिकताही बऱ्या पैकी एक्सपर्ट झालाय.मग आलो बालपणीच्या आठवणीत आणि सुरुवात केली चित्र काढायला आणि  काढले चित्र वेळेत.खूप मस्त वाटले अगदी लहानपणात गेल्या सारखे वाटले.या कोरोना काळात मोठी मंडळी तर कंटाळालीच आहेत  पण लहान मुलांना या काळात हँडल करणे म्हणजे जरासं कठीण होऊन बसलंय कारण ह्या कोरोनाने त्यांच बालपणचं हिरावलय,कारण ज्या प्रमाणात मैदानी खेळ त्यांनी खेळायला हवे ते त्यांना मिळतच नाहीये. पूर्वीचे खेळ किती सुदंर असायचे, लगोरी, टिक्कर बिल्ला, पिंकी पिंकी व्हॉट कलर, विटी दांडू मस्त असायचे सगळेच खेळ पण या इंटरनेट ने मुलांना काय मोठ्यांना पण वेडं करून सोडलंय म्हणून मुलामुलींनी outdoor activity सोबत indoor activity साठी कुठले तरी छंद जोपासले तर त्या मोबाईल पासून मुलांना काही काळ का होईना दूर ठेवता येतं अस मला वाटतं.कारण कोरोना काळात मुलांनी बाहेर जाणं जर risky वाटतं. म्हणून indoor activity हवी, नाहीतर तर इतरवेळेला मुलं बाहेर खेळतातच.

खरंच बालपण किती सुंदर असतं नाही काय ! आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परी तो व्यस्तच असतो. मग ती मोठी माणसं असोत की लहान मुलं असोत. आणि या इंटरनेट च्या दुनियेत तर जिथे जावे तिथे मग छोटं बाळ का असेना तो रडत असला की, त्याची आई देखील त्याच्या हातात  मोबाईल देते आणि काहीतरी लावून दिलं की,ते बाळही लगेच शांत राहतं.मग आता या छोट्या बाळाला काही समजत नसून देखील तो त्या मोबाईल च्या प्रेमात पडतो तर मोठी मंडळी आणि तरुण मुलं तर वेडीच झाली आहेत त्या मोबाईल मुळे. पूर्वी टेलिफोन होता तेव्हा इतकं नव्हतं त्या फोनच वेड कुणालाच.पण हळू हळू मोबाईल ची सुरुवात झाली आणि तो टेलिफोन तर पडद्याआड गेला म्हणायला काहीच हरकत नाही.पण वाईट याचंच वाटतं की,इंटरनेट चे जितके  फायदे आहे त्याच्या दुप्पट तोटेही आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही आणि हो एकदा काय त्या मोबाईल मधल्या गेम ची किंवा इतर apps ची सवय लागली की, मग त्यातून बाहेर निघणे खूपच कठीण आणि अशक्यप्राय बाब आहे.

बालकांच्या क्षेत्रात काम करताना हे मला प्रकर्षाने जाणवले की,मुलं एखाद्या गोष्टीच्या आहारी गेले की,त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे खूपच कठीण होऊन जातं आणि मग त्या मुलांना त्या अवस्थेतून बाहेर काढणे म्हणजे मुलांच्या आईवडिलांची देखील  तारेवरची कसरतच  होत असते.आजची तरुण पोरं ही त्या मोबाईल आणि इंटरनेट च्या इतकी नादी लागलीत की, त्यामुळे बरीच मुलं मुली गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळायला लागलेत. शिक्षणाकरिता काही काळ इंटरनेट/ मोबाईल वापरणे वाईट नाही कारण आता ती काळाची गरज झाली आहे असे म्हणायला हरकत नाही  पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्याचा दुरुपयोग होत असेल तर ते खूप धोकादायक ठरतं आणि त्याचा त्रास त्या मुलाला तर होतोच पण घरची मंडळी देखील त्याच्या त्या कृत्यामुळे  त्यांना देखील शरमेने मान खाली घालण्याची वेळ येते.म्हणूनच ८ ते ९ वर्षांपासून प्रत्येकचं आईवडिलांनी आपल्या मुलामुलींसोबत मैत्री चे नाते निर्माण करायला हवे कारण ८ ते १८ वर्ष वय हे  मुलामुलींसाठी खूपच महत्वपूर्ण असतं आणि त्यांच्या आई वडीलांसाठी सुध्दा कारण इथे मुलं चुकली की,त्यांना संधी देणं गरजेचं असतं एकदा का, ती हाताबाहेर गेली की,मग मात्र त्यांना समजावणे थोडं कठीण होऊन जातं आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर  त्यांना समुपदेशन, प्रेम आणि आपुलकीची अतिशय गरज असते.शहरात तर मोबाईल मुळे मुलांवर परिणाम होतोच आहे पण जर खेड्यातली परिस्थिती बघितली तर ती अजूनच वाईट असते कारण तिथे सगळ्या मुलांजवळ मोबाईल असेलच असे नाही एखादा मुलगा जरा बऱ्या घरचा असेल आणि त्याचा जवळ android मोबाईल असेल तर पूर्ण गावातली मुलं घोळका करून गल्ली बोळात बारीक मध्ये व्हिडिओ पाहत बसलेली असतात. आणि या अश्या व्हिडिओ,सिरिअल्स, मूव्हीस मुळं मुलांचं गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललयं आणि त्यातूनच चोरीचे तर प्रमाण वाढलेच आहे,का तर आई वडील मोबाईल घेऊन देत नाही, मोबाईल घ्यायचाय म्हणून चोरी केली,कुणी मुलं म्हणतात की,play station ला जाऊन game खेळायची (लत) लागली होती.मुद्दाम (लत)हा शब्द वापरलाय कारण हे सुद्धा एक व्यसनच आहे आणि त्या व्यसनापायी मुलं चोरी करतात एका मुलाला विचारले की, "चोरी क्यु की" तर तो म्हणाला की,"play station मे जाके खेलने की आदत लग गयी थी और घर से पैसे नही मिलते थे इसलीये चोरी की",बघा म्हणजे इतक्या छोट्याश्या कारणासाठी तो मुलगा त्याच्या आहारी गेला आणि चोरी करून बसला काही मुलं मुली  घाणेरडे पॉर्न विडिओ वगैरे बघून अशी घाणेरडी पाऊलं उचलतात. आणि अजून एक सांगावंसं वाटतंय की,मुलांकडे लक्ष देणं,त्यांच्याशी मैत्री करून त्यांना बोलतं करणं अत्यंत गरजेचे आहे त्यांना सांगायला हवे की, बेटा प्रत्येक गोष्ट आईबाबाला सांगत जा,खोटं बोलू नका,कुठलीही गोष्ट मनात ठेवू नका कारण आजकालची मुलंमुली बऱ्याच गोष्टी आई वडिलांपासून लपवून ठेवतात आणि मनातल्या मनात ठेवून मग टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या सारखे कृत्य करतात.आणि पालकांनी पण मुलांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे की,मुलगा कोणासोबत खेळतो,कोणासोबत जातो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांच्या नकळत का होईना लक्ष असायला हवे आणि मुलामुलींच्या वयापेक्षा मोठ्या मुलामुलींची संगत असायला नको.ती संगत लागली तर काही वाईट संगतीचा सहवासात मुलं केव्हा गुन्हेगारी कडे वळतील काहीच सांगता येत नाही.म्हणूनच मुलांकडे वेळीच लक्ष दिले गेले तर त्यांचे भविष्य तर सुधारेलच भारतालाही सुशिक्षित पिढी लाभेल यात यत्किंचितही शंका नाही.

ऍड.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

बा. क.स.अध्यक्ष चंद्रपूर.

फो. न.८४८४०८२२२४

Sunday, March 7, 2021

मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा)

 मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा-बलिकांचा)


सर्वप्रथम माझ्या सगळ्या फुलराणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐


हिरवेहिरवे गार गालिचे

हरित तृणांच्या मखमालीचे

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती...


आज अजूनही २१ व्या शतकात फुलराणी(स्त्री)ही मोकळा श्वास घेऊ शकते काय हो?आजही स्त्रियांच्या बाजूने निर्माण केलेले असंख्य कायदे, संघटना, उपक्रम या स्त्रीवादी कायद्यांच्या मखमलीवर ही फुलराणी नक्की खेळत आहे की, जळत आहे, असा प्रश्न तितक्याच आवेशाने उभा राहतो. 

स्वतंत्र भारतात तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल महिलांची प्रगती आणि त्यांच्या अधिकारांवर बोलताना. तसेच त्यांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी "महिला दिवस"आणि "जागतिक महिला दिवस" साजरा केला जातो. 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो. चला पाहूया 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो.


1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसेच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला गेला.दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.


जरी स्त्रिया आज मोठया मोठया पदावर काम करीत असल्या, अगदी राजकारणापासून ते भारतीय सेनेपर्यंत तिने आपली मजल मारली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तिच्यावर असलेली कुटुंबाची स्वयंपाक घरातील अग्नी तेवत ठेवायची जबाबदारी कायम आहेच. सती बळीची जागा हुंडाबळीने घेतली. गर्भजल परीक्षण, विनयभंग, बलात्कार अशा अनेक रुपाने स्त्रिया आजही सती जात आहेत. आजची परिस्थिती पाहता असे वाटते की, मग स्त्री सुधारणावादी कायद्यांनी केले काय? तर केवळ अन्याय अत्याचाराचे मुखवटे बदलले आणि स्त्री बाबतचा पारंपरिक दृष्टिकोन, तिचा छळ, अपमान कायम राहिला. स्त्रियांच्या बाजूने असंख्य कायदे, संघटना असल्या तरी तिचे प्रश्न कायम आहेत. निष्ठावान विवाहित स्त्रियांचे   प्रश्न आहेत. घटस्फोट घेतला नाही तर छळ आहे,प्रेम मान्य केले तर ठीक,नाही तर फुलराणीला जळणे आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाजूने मखमालीचे कायदे असले तरी ती वेगवेगळ्या रुपाने ती जळतेच आहे.फुलराणी म्हणजे आपल्याच लेकी सुना हो,जेव्हा प्रत्येकाच्या फुलराणीला घरी यायला उशीर होतो, तेव्हा  लागेना डोळ्याशी डोळा-काय जाहले फुलराणीला?अशी भीती मनात बसलेली असते म्हणजे लेकी सुना वेळेत घरी आल्या नाही की जीवात जीव नसतो,एकीकडे भाषणातून स्त्रियांबद्दलचे आदराचे शब्द, तिच्या कामगिरीचे शब्द, कौतुकाचे शब्द गायीले जात असले तरी ते मात्र प्रत्यक्षात हे सर्व भाषणापुरतेच राहतं.अजूनही स्त्री(फुलराणी) ही मोकळा श्वास पूर्णपणे घेऊच शकत नाही.


 मोबाईल इंटरनेट ने तर अश्लिलतेचा कळसचं गाठला अहे. आणखीन किती निर्भया, फुलराणी निर्माण होतील काय माहीती.शासनाचे अशा गुन्ह्यांबाबत लवचिक धोरण यामुळे प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या आधाशी नजरा टपलेल्या असतात. ना नात्याचा, ना वयाचा,ना माणुसकीचा विचार केला जातो. त्या नराधमांना हवी असते ती शिकार फक्त शिकार आणि म्हणून अनेक चिमुरड्यादेखील उमलण्याच्या आधीच खुडत आहेत.


 बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा नुसता हवेत नको तर प्रत्येकाच्या अंतरंगात असणे गरजेचे आहे. या देशात घडत असलेल्या घटना पाहताना "बेटी कैसे बचाएंगे"हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा असतो. एकतर्फी प्रेम, जबरदस्तीचे प्रेम, आपल्याला न मिळालेले प्रेम, दुसऱ्याला देखील मिळू देणार नाही, अशा संस्कारांचा आपला देश नाही. मग का होत आहे हे सगळे? आपली संस्कृती बदलत चालली आहे? त्यामागे प्रेम असते, दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधायचे असते. हे विचार गेले तरी कुठे?स्त्री ही कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, पत्नी, मुलगी असते. या सर्व भूमिकेतून आपल्या पुरुष असलेल्या मुलास, भावास व पतीस पुढे जाऊन सांगावे लागेल की,जसा आमचा मान राखतोस तसा आमच्या सारख्या स्त्रियांचादेखील मान राख.आता ही जबाबदारी देखील स्त्रियांवरच आली आहे. अशी भावना जर प्रत्येक मुलाने ठेवली तर अश्या गुन्ह्यांवर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल नाही काय?म्हणूनच मग आई जशी मुलीला बाहेर जाताना समजावून सांगते चांगल्या वागणुकीबद्दल तसेच चार शब्द आईनेच बाहेर जाणाऱ्या आपल्या मुलाला देखील सांगायला हवे की, स्त्री किंवा परक्या मुलीकडे वाईट नजरेने बघू नकोस म्हणून.


जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरण, आदरीकरण, आनंद, उत्साह, पारितोषिके, सन्मान, गौरव, पुरस्कार यामुळे दरवर्षी महिला दिन प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा वाटतो. मरगळलेल्या स्त्रीत्वाला एक उजाळा देण्यासाठी हा दिवस प्रेरक ठरतो.पण हे केवळ या एकाच दिवसापुरते मर्यादित नसावे. आपल्या नात्यातील पुरुष वर्गाला जर स्त्रीविषयक चांगले संस्कार मिळाले तर निश्चितच हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, मारहाण, शिवीगाळ,पुरुषप्रधान संस्कृतीतील मुस्कटदाबी थांबण्यास निश्चितच हातभार लागेल. या महिला दिनाच्या दिवशी एक आशा करूया की,ही  फुलराणी जळणार नाही तर खुलणारी, खेळणारी असेल आणि मग त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत राहील,आनंदी राहील.आताही या कोरोना महामारीच्या संकटात देखील स्त्री डगमगली नाही प्रत्येक क्षेत्रात तीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केले मग ती फुलराणी सबला नाही काय?बालकवींच्या हिरवे हिरवे गार गालिचे या कवितेच्या ओळींचा अर्थ सार्थकी लागेल.म्हणूनच आपल्या या फुलराणीला म्हणावेसे वाटते-


जीत पक्की है

कुछ करना है, तो डटकर चल।

थोड़ा दुनियां से हटकर चल।

लक पर तो सभी चल लेते है,

कभी इतिहास को पलटकर चल।

बिना काम के मुकाम कैसा ?

बिना मेहनत के, दाम कैसा ?

जब तक ना हाँसिल हो मंज़िल

तो राह में, आराम कैसा ?

अर्जुन सा, निशाना रख, मन में,

ना कोई बहाना रख।

जो लक्ष्य सामने है,

बस उसी पे अपना ठिकाना रख।

सोच मत, साकार कर ,

अपने कर्मो से प्यार कर।

मिलेंगा तेरी मेहनत का फल,

किसी और का ना इंतज़ार कर।

जो चले थे अकेले 

उनके पीछे आज कई लोगो के मेले हैं ।


ऍड. सौ.क्षमा आशिष बासरकर-धर्मपुरीवार

बा क. स. अध्यक्ष  चंद्रपूर. 8484082224

Wednesday, February 24, 2021

स्त्रियांच्या सुंदरछटा

 स्त्री हा शब्दच इतका सुंदर आहे की,तिच्या किती सुंदर छटा असू शकतात याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.स्त्री जीवनातील प्रत्येक अवस्था ही खरंच खूपचं अनोखी असते.

आमच्या घरी सगळ्यांनाच गोड खाण्याचे अतिशय वेड आहे काहीना ना काही गोड चालूच असतं  पण काल परवा ह्यांनी(अहोंनी)येताना आम्रखंड आणले आणि सहज विचार करताना सुचलं की,दही  हे दुधापासून बनतं त्या दह्यापासूनच श्रीखंडही बनतं हे सगळ्यांना माहितीच आहे. मग स्त्री जशी महत्वाची असते तर स्त्री सुद्धा ह्या दुधासारखी असते असे म्हणायला हरकत नाही नाही काय?बघा ना त्या दुधापासून जसे ,दही,ताक, लोणी,तूप बनतं तश्याच ह्या म्हणजे स्त्री जीवनातील वेगवेगळ्या रंगछटा असू शकतात खरयं की, नाही तर ह्या स्त्रियांच्या रंगछटा कशा असू शकतात ते थोडक्यात बघूया, बघा आवडतंय काय?

                               स्त्रियांच्या सुंदरछटा

"दूध,दही,ताक,लोणी,तूप" हे लक्षात आल्यावर असे वाटले की, अरे ह्या तर सर्वच स्त्री जीवनाच्या अवस्था आहेत असं मला वाटतं, आता तुम्ही ठरवून मला सांगायचे आहे होय की नाही ते.बघूया कसे ते..?

"दूध"

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:- कुमारिका जीवन निर्मल, शुद्ध म्हणून देवाची पण पूजा करताना पाण्यात दूध घालून देवाला अंघोळ घालतात कारण आपण त्याला शुद्ध मानतो खरंय ना,दूध म्हणजे माहेर,दूध म्हणजे आईवडिलांशी असलेलं शुभ्र,सकस,निर्भेळ असं नातं की,ज्यात स्वार्थाचं पाणी टाकून त्या दुधाला वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं म्हणूनच त्यावेळी तिला तीचं ते जग सुद्धा दुधा सारखे स्वच्छ ,सुंदर,निर्भेळ आणि निरागस दिसतं.

"दही" 

म्हणजे नववधू.दही सुद्धा शुद्धच बरं का कारण दही सुद्धा पंचामृतामध्ये देवाचं तीर्थ म्हणून वापरल्या जातं तर तेही शुद्धच नाही का? कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू  होते.दुधाचं  नाव बदलून दही होतं!तसंच कुमारिकेचे ही लग्नानंतर नाव बदलल्याच जातं तर तिथे तिची पण अवस्था बदलते आणि ती भावनिक दृष्ट्या घट्ट होते जसे दुधाला विरजण घातले की दही बनून ते दही म्हणजे त्याच अवस्थेत  थिजून घट्ट होणं जशी नववधू दुसऱ्या घरी गेली की घट्ट होते.लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत दह्या सारखी थिजून राहते. दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. बऱ्याच मुली ह्या कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी स्त्री त्याच्याप्रती खूपच निष्ठा दाखवते होय ना का तर नवरा हा "पती परमेश्वर" असतो म्हणून ?नाही तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं दह्यासारखं.खरंय ना.दह्याचं पुढे जाऊन ताक बनतं तर या ताकाचं स्त्री शी काय साम्य जुळतंय बघूया.

"ताक"

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. आणि मग ते घट्ट नातंच पुढे मुलींना संसार सुखाचा करण्यास नक्कीच मदत होते.

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं."दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."ताक हे अतिशय बहुगुणी असतं असं आयुर्वेदात म्हटलंय.

म्हणूनच घरातल्यांचा स्वभाव जसे की,सासू सासरे असो ननंद असो की,नवरा प्रत्येकाची स्वभाव प्रकृती ही वेगळीच असते कुणाचा बडबडा( वात प्रकृती )तर कुणाचा रागीष्ट(पित्त प्रकृती)अश्या प्रकृतीवर ताक हे फारच गुणकारी असते.ताक दोघांनाही शांत करतं.यांवर उत्तम उपाय आहे असं आयुर्वेद म्हणतो.

"ताक" म्हणजे सुनेचं सासरच्यांशी असलेलं नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय असते. तिथे दुधाचा उपयोग होत नाही.

दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं.ताकाला घुसळल्यानंतरच मऊ लोणी तयार होतं.

"लोणी"

लोणी म्हणजे अनेक वर्षे लग्नाला होऊन गेल्यानंतरही नवरा,बायको आणि मुलांकरिता आईच्या प्रेमामधला रेशमी सहवास असतो.ताकाला घुसळल्यानंतरच मऊ लोणी तयार होतं होय ना,अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग अनेक  वर्षांनी जेव्हा माझ्या संसाराचे फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा,मऊ,रेशमी,मुलायम,नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो हेच त्या ताकाचे फलित नाही काय.

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी आणि मुलांसोबत असलेलं स्त्रीचं सुंदर नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण न कण  'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात.हेच तर ते त्या सुंदर नात्याचं फलित असतं.

"तूप"

लोणी' ही तिची(स्त्रीची)अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.लोणी कढवून तूप तयार होतं तसंच लोणी जसं आपलं रूप बदलतं .तसंच स्त्री देखील नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं "साजूक तूप होतं".

मग ते साजूक तूप वरणभात असो,शिरा असो किंवा   पुरणपोळी असो त्यावर पळीभर  साजूक तूप पडलं की, जादूच घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात घातलेली वात  बघितली की, घरासाठी येता जाता हात जोडणारी आपल्या घरासाठी त्या म्हातार अवस्थेतही गेल्यावर सुध्दा घरासाठी झटणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी,कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची  अंतिम उच्च  अवस्था होय असे मला वाटते.

"दूध ते तूप"

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. "स्री आहे तर "श्री" आहे हे म्हणनं वावगं ठरूं नये."

"असा हा स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा" ह्या प्रवासास तथा "स्त्री "जातीस मानाचा मुजरा.


ऍड. क्षमा आशिष बासरकर-धर्मपुरीवार.

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

8484082224


Wednesday, December 2, 2020

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

                     माणसाने माणसाशी माणसासम वागणे

माणूस,माणूस म्हटला की, त्यासोबत स्वार्थ हा शब्द part and parcel असतोच नाही काय?माणसाने किती स्वार्थी असायला हवे याची पण काही मर्यादा असायला हवी.काही जण या जगात निःस्वार्थी पण आहेत हो.पण खरंच आजची परिस्थिती बघितली की, चीड येते खूप,तळपायाची आग मस्तकात जाते.

व्यक्तीला/माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांच्या मनाला येईल तसे बोललेच पाहिजे जरुरी नाही ना पण नाही "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणची भीती" असेच वागतात काही लोक.समाज माध्यमांवर तर इतक्या पोस्ट येत असतात की, असं वाटतं सडेतोड उत्तर द्यावे त्यांच्या बोलण्यावर पण काय शेवटी तेच ना की,आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला मग.अरे पूर्वीचे लोक वाईट वागले म्हणून त्याची शिक्षा ज्याच्यापरी तो समाज भोगतच आहे की,पण आता कुठे तसं राहिलंय समाज बदलला व्यक्तीच्या भावना आणि वागणूक बदलली तरीही व्यक्ती मधला तिढा काही केल्या सुटत नाही.का माणूसच माणसाच्या जीवावर उठलेला दिसतो अरे स्वतःच्या स्वार्थापोटी आणखी किती स्वार्थी व्हाल.

आता पर्यंत हिंदू मुस्लिम वाद चालायचा तो जगमान्यच आहे.तो वाद विकोपाला गेलेला आहे आणि तो तिढा कधी सुटणार देवच जाणे पण आता हिंदू हिंदू सुद्धा भांडायला लागलेत किती ती घाणेरडी वृत्ती झाली आहे लोकांची,अरे कधी माणसं माणसांना समजून घेतील.प्रत्येक जण आपल्या लढ्यासाठी लढतोच त्यात काही नवल आहे काय पण मला म्हणायचंय की,स्वतः लढताना दुसऱ्या समाजावर चिखल फेकण्यापेक्षा तुमचे लढण्याचे ध्येय काय हे बघायला हवे.सत्ता,मानसन्मान हवा असला की, कुठल्याश्या पक्षाचा आधार घेऊन सगळा उपभोग घ्यायचा बरं एवढ्यावर माणूस थांबतो काय,त्याची भूक कुठे क्षमलेली असते त्याची भूक अजून वाढलेली असते,पण जेव्हा भूक वाढल्यावर काहीच मिळत नाही तेव्हा व्यक्ती दुसऱ्याला दोष द्यायला पण कमी जास्त बघत नाही काही महान लोक तर अक्षरशः एका proper समाजाची जात काढायला मागे पुढे बघत नाही, मग आता कोण जातीयवाद पसरवतो आहे आणि का म्हणून, अरे तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही म्हणून तुम्ही एखाद्या जातीला किती बदनाम करण्याचा प्रयत्न कराल किती नीच आणि घाणेरडी वृत्ती झाली आहे माणसाची,त्यात राजकीय पक्षाला पण ओढल्या जातं.

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट अशी म्हण मराठीत प्रचलित आहे.हीच म्हण सध्या हिंदू समाजामध्ये मराठी मराठी लोकांमध्ये घडून येताना दिसतंय.अरे प्रत्येकाचेच हक्काची लढाई ही असतेच ना लढा ना कोण नाही म्हणतंय पण दुसऱ्यावर चिखलफेक न करता लढा म्हणावं. म्हणूनच म्हणावं वाटतं माणसाने माणसाशी माणसासम वागणे.


ऍड. क्षमा आ.बासरकर- धर्मपुरीवार.

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

फोन न.८४८४०८२२२४

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व…

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व… काही प्रसंग आयुष्यात असे घडतात की ते आपल्याला निसर्ग, प्रेम, माया आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ शिकवून जातात. आमच...