Friday, March 26, 2021

बालपण - एक फुलपाखरु, इंटरनेट च्या चक्रव्यूहात अडकलेलं

    (बालपण - एक फुलपाखरु, इंटरनेट च्या चक्रव्यूहात अडकलेलं)


बालपण म्हणजे स्वछंदी फुलपाखरू,

बालपण म्हणजे निस्वार्थ प्रेम,

बालपण म्हणजे निस्वार्थ हसणं,

बालपण म्हणजे निस्वार्थ जगणं, 

बालपण म्हणजे एक सुंदर अनुभूती.

Thank u अवधूत बेटा खरंच तू आज आम्हा(आई-बाबा) दोघांनाही बालपणीची आठवण करून दिलीस.दिवसभर आम्ही व्यस्त असतो त्यामुळे अवधुतला वेळ द्यायला आम्ही ऑफीस मधून घरी आल्यानंतर आणि सुट्टीचे दिवस असतात. तर काल रात्री त्यालाच सुचलं आणि म्हणाला आई बाबा आपण मी सांगेल तसा गेम खेळूया  काय?आम्ही म्हटले "कुठला गेम खेळायचा बेटा"तर तो म्हणाला की,आपण आज चित्र काढून बघण्याची स्पर्धा करूया तिघेपण जण, पहिल्यांदा नको वाटले कारण आता किती तरी दिवस झाले असतील चित्र काढणे वगैरे सगळं दूरच राहिलंय पण त्याच्या आनंदासाठी आम्ही दोघेही तयार झालो त्याने आम्हला सांगितले की,आई बाबा मी वेळ देणार त्यावेळेत चित्र काढा कुठलही चित्र काढा तुम्हाला जे वाटतं ते, तोही काढणार होताच आमच्या सोबत चित्र,तो तर आता न शिकताही बऱ्या पैकी एक्सपर्ट झालाय.मग आलो बालपणीच्या आठवणीत आणि सुरुवात केली चित्र काढायला आणि  काढले चित्र वेळेत.खूप मस्त वाटले अगदी लहानपणात गेल्या सारखे वाटले.या कोरोना काळात मोठी मंडळी तर कंटाळालीच आहेत  पण लहान मुलांना या काळात हँडल करणे म्हणजे जरासं कठीण होऊन बसलंय कारण ह्या कोरोनाने त्यांच बालपणचं हिरावलय,कारण ज्या प्रमाणात मैदानी खेळ त्यांनी खेळायला हवे ते त्यांना मिळतच नाहीये. पूर्वीचे खेळ किती सुदंर असायचे, लगोरी, टिक्कर बिल्ला, पिंकी पिंकी व्हॉट कलर, विटी दांडू मस्त असायचे सगळेच खेळ पण या इंटरनेट ने मुलांना काय मोठ्यांना पण वेडं करून सोडलंय म्हणून मुलामुलींनी outdoor activity सोबत indoor activity साठी कुठले तरी छंद जोपासले तर त्या मोबाईल पासून मुलांना काही काळ का होईना दूर ठेवता येतं अस मला वाटतं.कारण कोरोना काळात मुलांनी बाहेर जाणं जर risky वाटतं. म्हणून indoor activity हवी, नाहीतर तर इतरवेळेला मुलं बाहेर खेळतातच.

खरंच बालपण किती सुंदर असतं नाही काय ! आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परी तो व्यस्तच असतो. मग ती मोठी माणसं असोत की लहान मुलं असोत. आणि या इंटरनेट च्या दुनियेत तर जिथे जावे तिथे मग छोटं बाळ का असेना तो रडत असला की, त्याची आई देखील त्याच्या हातात  मोबाईल देते आणि काहीतरी लावून दिलं की,ते बाळही लगेच शांत राहतं.मग आता या छोट्या बाळाला काही समजत नसून देखील तो त्या मोबाईल च्या प्रेमात पडतो तर मोठी मंडळी आणि तरुण मुलं तर वेडीच झाली आहेत त्या मोबाईल मुळे. पूर्वी टेलिफोन होता तेव्हा इतकं नव्हतं त्या फोनच वेड कुणालाच.पण हळू हळू मोबाईल ची सुरुवात झाली आणि तो टेलिफोन तर पडद्याआड गेला म्हणायला काहीच हरकत नाही.पण वाईट याचंच वाटतं की,इंटरनेट चे जितके  फायदे आहे त्याच्या दुप्पट तोटेही आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही आणि हो एकदा काय त्या मोबाईल मधल्या गेम ची किंवा इतर apps ची सवय लागली की, मग त्यातून बाहेर निघणे खूपच कठीण आणि अशक्यप्राय बाब आहे.

बालकांच्या क्षेत्रात काम करताना हे मला प्रकर्षाने जाणवले की,मुलं एखाद्या गोष्टीच्या आहारी गेले की,त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे खूपच कठीण होऊन जातं आणि मग त्या मुलांना त्या अवस्थेतून बाहेर काढणे म्हणजे मुलांच्या आईवडिलांची देखील  तारेवरची कसरतच  होत असते.आजची तरुण पोरं ही त्या मोबाईल आणि इंटरनेट च्या इतकी नादी लागलीत की, त्यामुळे बरीच मुलं मुली गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळायला लागलेत. शिक्षणाकरिता काही काळ इंटरनेट/ मोबाईल वापरणे वाईट नाही कारण आता ती काळाची गरज झाली आहे असे म्हणायला हरकत नाही  पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्याचा दुरुपयोग होत असेल तर ते खूप धोकादायक ठरतं आणि त्याचा त्रास त्या मुलाला तर होतोच पण घरची मंडळी देखील त्याच्या त्या कृत्यामुळे  त्यांना देखील शरमेने मान खाली घालण्याची वेळ येते.म्हणूनच ८ ते ९ वर्षांपासून प्रत्येकचं आईवडिलांनी आपल्या मुलामुलींसोबत मैत्री चे नाते निर्माण करायला हवे कारण ८ ते १८ वर्ष वय हे  मुलामुलींसाठी खूपच महत्वपूर्ण असतं आणि त्यांच्या आई वडीलांसाठी सुध्दा कारण इथे मुलं चुकली की,त्यांना संधी देणं गरजेचं असतं एकदा का, ती हाताबाहेर गेली की,मग मात्र त्यांना समजावणे थोडं कठीण होऊन जातं आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर  त्यांना समुपदेशन, प्रेम आणि आपुलकीची अतिशय गरज असते.शहरात तर मोबाईल मुळे मुलांवर परिणाम होतोच आहे पण जर खेड्यातली परिस्थिती बघितली तर ती अजूनच वाईट असते कारण तिथे सगळ्या मुलांजवळ मोबाईल असेलच असे नाही एखादा मुलगा जरा बऱ्या घरचा असेल आणि त्याचा जवळ android मोबाईल असेल तर पूर्ण गावातली मुलं घोळका करून गल्ली बोळात बारीक मध्ये व्हिडिओ पाहत बसलेली असतात. आणि या अश्या व्हिडिओ,सिरिअल्स, मूव्हीस मुळं मुलांचं गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललयं आणि त्यातूनच चोरीचे तर प्रमाण वाढलेच आहे,का तर आई वडील मोबाईल घेऊन देत नाही, मोबाईल घ्यायचाय म्हणून चोरी केली,कुणी मुलं म्हणतात की,play station ला जाऊन game खेळायची (लत) लागली होती.मुद्दाम (लत)हा शब्द वापरलाय कारण हे सुद्धा एक व्यसनच आहे आणि त्या व्यसनापायी मुलं चोरी करतात एका मुलाला विचारले की, "चोरी क्यु की" तर तो म्हणाला की,"play station मे जाके खेलने की आदत लग गयी थी और घर से पैसे नही मिलते थे इसलीये चोरी की",बघा म्हणजे इतक्या छोट्याश्या कारणासाठी तो मुलगा त्याच्या आहारी गेला आणि चोरी करून बसला काही मुलं मुली  घाणेरडे पॉर्न विडिओ वगैरे बघून अशी घाणेरडी पाऊलं उचलतात. आणि अजून एक सांगावंसं वाटतंय की,मुलांकडे लक्ष देणं,त्यांच्याशी मैत्री करून त्यांना बोलतं करणं अत्यंत गरजेचे आहे त्यांना सांगायला हवे की, बेटा प्रत्येक गोष्ट आईबाबाला सांगत जा,खोटं बोलू नका,कुठलीही गोष्ट मनात ठेवू नका कारण आजकालची मुलंमुली बऱ्याच गोष्टी आई वडिलांपासून लपवून ठेवतात आणि मनातल्या मनात ठेवून मग टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या सारखे कृत्य करतात.आणि पालकांनी पण मुलांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे की,मुलगा कोणासोबत खेळतो,कोणासोबत जातो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांच्या नकळत का होईना लक्ष असायला हवे आणि मुलामुलींच्या वयापेक्षा मोठ्या मुलामुलींची संगत असायला नको.ती संगत लागली तर काही वाईट संगतीचा सहवासात मुलं केव्हा गुन्हेगारी कडे वळतील काहीच सांगता येत नाही.म्हणूनच मुलांकडे वेळीच लक्ष दिले गेले तर त्यांचे भविष्य तर सुधारेलच भारतालाही सुशिक्षित पिढी लाभेल यात यत्किंचितही शंका नाही.

ऍड.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

बा. क.स.अध्यक्ष चंद्रपूर.

फो. न.८४८४०८२२२४

Sunday, March 7, 2021

मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा)

 मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा-बलिकांचा)


सर्वप्रथम माझ्या सगळ्या फुलराणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐


हिरवेहिरवे गार गालिचे

हरित तृणांच्या मखमालीचे

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती...


आज अजूनही २१ व्या शतकात फुलराणी(स्त्री)ही मोकळा श्वास घेऊ शकते काय हो?आजही स्त्रियांच्या बाजूने निर्माण केलेले असंख्य कायदे, संघटना, उपक्रम या स्त्रीवादी कायद्यांच्या मखमलीवर ही फुलराणी नक्की खेळत आहे की, जळत आहे, असा प्रश्न तितक्याच आवेशाने उभा राहतो. 

स्वतंत्र भारतात तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल महिलांची प्रगती आणि त्यांच्या अधिकारांवर बोलताना. तसेच त्यांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी "महिला दिवस"आणि "जागतिक महिला दिवस" साजरा केला जातो. 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो. चला पाहूया 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो.


1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसेच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला गेला.दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.


जरी स्त्रिया आज मोठया मोठया पदावर काम करीत असल्या, अगदी राजकारणापासून ते भारतीय सेनेपर्यंत तिने आपली मजल मारली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तिच्यावर असलेली कुटुंबाची स्वयंपाक घरातील अग्नी तेवत ठेवायची जबाबदारी कायम आहेच. सती बळीची जागा हुंडाबळीने घेतली. गर्भजल परीक्षण, विनयभंग, बलात्कार अशा अनेक रुपाने स्त्रिया आजही सती जात आहेत. आजची परिस्थिती पाहता असे वाटते की, मग स्त्री सुधारणावादी कायद्यांनी केले काय? तर केवळ अन्याय अत्याचाराचे मुखवटे बदलले आणि स्त्री बाबतचा पारंपरिक दृष्टिकोन, तिचा छळ, अपमान कायम राहिला. स्त्रियांच्या बाजूने असंख्य कायदे, संघटना असल्या तरी तिचे प्रश्न कायम आहेत. निष्ठावान विवाहित स्त्रियांचे   प्रश्न आहेत. घटस्फोट घेतला नाही तर छळ आहे,प्रेम मान्य केले तर ठीक,नाही तर फुलराणीला जळणे आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाजूने मखमालीचे कायदे असले तरी ती वेगवेगळ्या रुपाने ती जळतेच आहे.फुलराणी म्हणजे आपल्याच लेकी सुना हो,जेव्हा प्रत्येकाच्या फुलराणीला घरी यायला उशीर होतो, तेव्हा  लागेना डोळ्याशी डोळा-काय जाहले फुलराणीला?अशी भीती मनात बसलेली असते म्हणजे लेकी सुना वेळेत घरी आल्या नाही की जीवात जीव नसतो,एकीकडे भाषणातून स्त्रियांबद्दलचे आदराचे शब्द, तिच्या कामगिरीचे शब्द, कौतुकाचे शब्द गायीले जात असले तरी ते मात्र प्रत्यक्षात हे सर्व भाषणापुरतेच राहतं.अजूनही स्त्री(फुलराणी) ही मोकळा श्वास पूर्णपणे घेऊच शकत नाही.


 मोबाईल इंटरनेट ने तर अश्लिलतेचा कळसचं गाठला अहे. आणखीन किती निर्भया, फुलराणी निर्माण होतील काय माहीती.शासनाचे अशा गुन्ह्यांबाबत लवचिक धोरण यामुळे प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या आधाशी नजरा टपलेल्या असतात. ना नात्याचा, ना वयाचा,ना माणुसकीचा विचार केला जातो. त्या नराधमांना हवी असते ती शिकार फक्त शिकार आणि म्हणून अनेक चिमुरड्यादेखील उमलण्याच्या आधीच खुडत आहेत.


 बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा नुसता हवेत नको तर प्रत्येकाच्या अंतरंगात असणे गरजेचे आहे. या देशात घडत असलेल्या घटना पाहताना "बेटी कैसे बचाएंगे"हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा असतो. एकतर्फी प्रेम, जबरदस्तीचे प्रेम, आपल्याला न मिळालेले प्रेम, दुसऱ्याला देखील मिळू देणार नाही, अशा संस्कारांचा आपला देश नाही. मग का होत आहे हे सगळे? आपली संस्कृती बदलत चालली आहे? त्यामागे प्रेम असते, दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधायचे असते. हे विचार गेले तरी कुठे?स्त्री ही कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, पत्नी, मुलगी असते. या सर्व भूमिकेतून आपल्या पुरुष असलेल्या मुलास, भावास व पतीस पुढे जाऊन सांगावे लागेल की,जसा आमचा मान राखतोस तसा आमच्या सारख्या स्त्रियांचादेखील मान राख.आता ही जबाबदारी देखील स्त्रियांवरच आली आहे. अशी भावना जर प्रत्येक मुलाने ठेवली तर अश्या गुन्ह्यांवर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल नाही काय?म्हणूनच मग आई जशी मुलीला बाहेर जाताना समजावून सांगते चांगल्या वागणुकीबद्दल तसेच चार शब्द आईनेच बाहेर जाणाऱ्या आपल्या मुलाला देखील सांगायला हवे की, स्त्री किंवा परक्या मुलीकडे वाईट नजरेने बघू नकोस म्हणून.


जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरण, आदरीकरण, आनंद, उत्साह, पारितोषिके, सन्मान, गौरव, पुरस्कार यामुळे दरवर्षी महिला दिन प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा वाटतो. मरगळलेल्या स्त्रीत्वाला एक उजाळा देण्यासाठी हा दिवस प्रेरक ठरतो.पण हे केवळ या एकाच दिवसापुरते मर्यादित नसावे. आपल्या नात्यातील पुरुष वर्गाला जर स्त्रीविषयक चांगले संस्कार मिळाले तर निश्चितच हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, मारहाण, शिवीगाळ,पुरुषप्रधान संस्कृतीतील मुस्कटदाबी थांबण्यास निश्चितच हातभार लागेल. या महिला दिनाच्या दिवशी एक आशा करूया की,ही  फुलराणी जळणार नाही तर खुलणारी, खेळणारी असेल आणि मग त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत राहील,आनंदी राहील.आताही या कोरोना महामारीच्या संकटात देखील स्त्री डगमगली नाही प्रत्येक क्षेत्रात तीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केले मग ती फुलराणी सबला नाही काय?बालकवींच्या हिरवे हिरवे गार गालिचे या कवितेच्या ओळींचा अर्थ सार्थकी लागेल.म्हणूनच आपल्या या फुलराणीला म्हणावेसे वाटते-


जीत पक्की है

कुछ करना है, तो डटकर चल।

थोड़ा दुनियां से हटकर चल।

लक पर तो सभी चल लेते है,

कभी इतिहास को पलटकर चल।

बिना काम के मुकाम कैसा ?

बिना मेहनत के, दाम कैसा ?

जब तक ना हाँसिल हो मंज़िल

तो राह में, आराम कैसा ?

अर्जुन सा, निशाना रख, मन में,

ना कोई बहाना रख।

जो लक्ष्य सामने है,

बस उसी पे अपना ठिकाना रख।

सोच मत, साकार कर ,

अपने कर्मो से प्यार कर।

मिलेंगा तेरी मेहनत का फल,

किसी और का ना इंतज़ार कर।

जो चले थे अकेले 

उनके पीछे आज कई लोगो के मेले हैं ।


ऍड. सौ.क्षमा आशिष बासरकर-धर्मपुरीवार

बा क. स. अध्यक्ष  चंद्रपूर. 8484082224

Wednesday, February 24, 2021

स्त्रियांच्या सुंदरछटा

 स्त्री हा शब्दच इतका सुंदर आहे की,तिच्या किती सुंदर छटा असू शकतात याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.स्त्री जीवनातील प्रत्येक अवस्था ही खरंच खूपचं अनोखी असते.

आमच्या घरी सगळ्यांनाच गोड खाण्याचे अतिशय वेड आहे काहीना ना काही गोड चालूच असतं  पण काल परवा ह्यांनी(अहोंनी)येताना आम्रखंड आणले आणि सहज विचार करताना सुचलं की,दही  हे दुधापासून बनतं त्या दह्यापासूनच श्रीखंडही बनतं हे सगळ्यांना माहितीच आहे. मग स्त्री जशी महत्वाची असते तर स्त्री सुद्धा ह्या दुधासारखी असते असे म्हणायला हरकत नाही नाही काय?बघा ना त्या दुधापासून जसे ,दही,ताक, लोणी,तूप बनतं तश्याच ह्या म्हणजे स्त्री जीवनातील वेगवेगळ्या रंगछटा असू शकतात खरयं की, नाही तर ह्या स्त्रियांच्या रंगछटा कशा असू शकतात ते थोडक्यात बघूया, बघा आवडतंय काय?

                               स्त्रियांच्या सुंदरछटा

"दूध,दही,ताक,लोणी,तूप" हे लक्षात आल्यावर असे वाटले की, अरे ह्या तर सर्वच स्त्री जीवनाच्या अवस्था आहेत असं मला वाटतं, आता तुम्ही ठरवून मला सांगायचे आहे होय की नाही ते.बघूया कसे ते..?

"दूध"

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:- कुमारिका जीवन निर्मल, शुद्ध म्हणून देवाची पण पूजा करताना पाण्यात दूध घालून देवाला अंघोळ घालतात कारण आपण त्याला शुद्ध मानतो खरंय ना,दूध म्हणजे माहेर,दूध म्हणजे आईवडिलांशी असलेलं शुभ्र,सकस,निर्भेळ असं नातं की,ज्यात स्वार्थाचं पाणी टाकून त्या दुधाला वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं म्हणूनच त्यावेळी तिला तीचं ते जग सुद्धा दुधा सारखे स्वच्छ ,सुंदर,निर्भेळ आणि निरागस दिसतं.

"दही" 

म्हणजे नववधू.दही सुद्धा शुद्धच बरं का कारण दही सुद्धा पंचामृतामध्ये देवाचं तीर्थ म्हणून वापरल्या जातं तर तेही शुद्धच नाही का? कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू  होते.दुधाचं  नाव बदलून दही होतं!तसंच कुमारिकेचे ही लग्नानंतर नाव बदलल्याच जातं तर तिथे तिची पण अवस्था बदलते आणि ती भावनिक दृष्ट्या घट्ट होते जसे दुधाला विरजण घातले की दही बनून ते दही म्हणजे त्याच अवस्थेत  थिजून घट्ट होणं जशी नववधू दुसऱ्या घरी गेली की घट्ट होते.लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत दह्या सारखी थिजून राहते. दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. बऱ्याच मुली ह्या कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी स्त्री त्याच्याप्रती खूपच निष्ठा दाखवते होय ना का तर नवरा हा "पती परमेश्वर" असतो म्हणून ?नाही तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं दह्यासारखं.खरंय ना.दह्याचं पुढे जाऊन ताक बनतं तर या ताकाचं स्त्री शी काय साम्य जुळतंय बघूया.

"ताक"

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. आणि मग ते घट्ट नातंच पुढे मुलींना संसार सुखाचा करण्यास नक्कीच मदत होते.

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं."दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."ताक हे अतिशय बहुगुणी असतं असं आयुर्वेदात म्हटलंय.

म्हणूनच घरातल्यांचा स्वभाव जसे की,सासू सासरे असो ननंद असो की,नवरा प्रत्येकाची स्वभाव प्रकृती ही वेगळीच असते कुणाचा बडबडा( वात प्रकृती )तर कुणाचा रागीष्ट(पित्त प्रकृती)अश्या प्रकृतीवर ताक हे फारच गुणकारी असते.ताक दोघांनाही शांत करतं.यांवर उत्तम उपाय आहे असं आयुर्वेद म्हणतो.

"ताक" म्हणजे सुनेचं सासरच्यांशी असलेलं नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय असते. तिथे दुधाचा उपयोग होत नाही.

दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं.ताकाला घुसळल्यानंतरच मऊ लोणी तयार होतं.

"लोणी"

लोणी म्हणजे अनेक वर्षे लग्नाला होऊन गेल्यानंतरही नवरा,बायको आणि मुलांकरिता आईच्या प्रेमामधला रेशमी सहवास असतो.ताकाला घुसळल्यानंतरच मऊ लोणी तयार होतं होय ना,अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग अनेक  वर्षांनी जेव्हा माझ्या संसाराचे फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा,मऊ,रेशमी,मुलायम,नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो हेच त्या ताकाचे फलित नाही काय.

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी आणि मुलांसोबत असलेलं स्त्रीचं सुंदर नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण न कण  'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात.हेच तर ते त्या सुंदर नात्याचं फलित असतं.

"तूप"

लोणी' ही तिची(स्त्रीची)अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.लोणी कढवून तूप तयार होतं तसंच लोणी जसं आपलं रूप बदलतं .तसंच स्त्री देखील नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं "साजूक तूप होतं".

मग ते साजूक तूप वरणभात असो,शिरा असो किंवा   पुरणपोळी असो त्यावर पळीभर  साजूक तूप पडलं की, जादूच घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात घातलेली वात  बघितली की, घरासाठी येता जाता हात जोडणारी आपल्या घरासाठी त्या म्हातार अवस्थेतही गेल्यावर सुध्दा घरासाठी झटणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी,कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची  अंतिम उच्च  अवस्था होय असे मला वाटते.

"दूध ते तूप"

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. "स्री आहे तर "श्री" आहे हे म्हणनं वावगं ठरूं नये."

"असा हा स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा" ह्या प्रवासास तथा "स्त्री "जातीस मानाचा मुजरा.


ऍड. क्षमा आशिष बासरकर-धर्मपुरीवार.

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

8484082224


Wednesday, December 2, 2020

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

                     माणसाने माणसाशी माणसासम वागणे

माणूस,माणूस म्हटला की, त्यासोबत स्वार्थ हा शब्द part and parcel असतोच नाही काय?माणसाने किती स्वार्थी असायला हवे याची पण काही मर्यादा असायला हवी.काही जण या जगात निःस्वार्थी पण आहेत हो.पण खरंच आजची परिस्थिती बघितली की, चीड येते खूप,तळपायाची आग मस्तकात जाते.

व्यक्तीला/माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांच्या मनाला येईल तसे बोललेच पाहिजे जरुरी नाही ना पण नाही "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणची भीती" असेच वागतात काही लोक.समाज माध्यमांवर तर इतक्या पोस्ट येत असतात की, असं वाटतं सडेतोड उत्तर द्यावे त्यांच्या बोलण्यावर पण काय शेवटी तेच ना की,आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला मग.अरे पूर्वीचे लोक वाईट वागले म्हणून त्याची शिक्षा ज्याच्यापरी तो समाज भोगतच आहे की,पण आता कुठे तसं राहिलंय समाज बदलला व्यक्तीच्या भावना आणि वागणूक बदलली तरीही व्यक्ती मधला तिढा काही केल्या सुटत नाही.का माणूसच माणसाच्या जीवावर उठलेला दिसतो अरे स्वतःच्या स्वार्थापोटी आणखी किती स्वार्थी व्हाल.

आता पर्यंत हिंदू मुस्लिम वाद चालायचा तो जगमान्यच आहे.तो वाद विकोपाला गेलेला आहे आणि तो तिढा कधी सुटणार देवच जाणे पण आता हिंदू हिंदू सुद्धा भांडायला लागलेत किती ती घाणेरडी वृत्ती झाली आहे लोकांची,अरे कधी माणसं माणसांना समजून घेतील.प्रत्येक जण आपल्या लढ्यासाठी लढतोच त्यात काही नवल आहे काय पण मला म्हणायचंय की,स्वतः लढताना दुसऱ्या समाजावर चिखल फेकण्यापेक्षा तुमचे लढण्याचे ध्येय काय हे बघायला हवे.सत्ता,मानसन्मान हवा असला की, कुठल्याश्या पक्षाचा आधार घेऊन सगळा उपभोग घ्यायचा बरं एवढ्यावर माणूस थांबतो काय,त्याची भूक कुठे क्षमलेली असते त्याची भूक अजून वाढलेली असते,पण जेव्हा भूक वाढल्यावर काहीच मिळत नाही तेव्हा व्यक्ती दुसऱ्याला दोष द्यायला पण कमी जास्त बघत नाही काही महान लोक तर अक्षरशः एका proper समाजाची जात काढायला मागे पुढे बघत नाही, मग आता कोण जातीयवाद पसरवतो आहे आणि का म्हणून, अरे तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही म्हणून तुम्ही एखाद्या जातीला किती बदनाम करण्याचा प्रयत्न कराल किती नीच आणि घाणेरडी वृत्ती झाली आहे माणसाची,त्यात राजकीय पक्षाला पण ओढल्या जातं.

आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट अशी म्हण मराठीत प्रचलित आहे.हीच म्हण सध्या हिंदू समाजामध्ये मराठी मराठी लोकांमध्ये घडून येताना दिसतंय.अरे प्रत्येकाचेच हक्काची लढाई ही असतेच ना लढा ना कोण नाही म्हणतंय पण दुसऱ्यावर चिखलफेक न करता लढा म्हणावं. म्हणूनच म्हणावं वाटतं माणसाने माणसाशी माणसासम वागणे.


ऍड. क्षमा आ.बासरकर- धर्मपुरीवार.

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

फोन न.८४८४०८२२२४

Wednesday, November 4, 2020

देश हा समृद्धीचा- कायदा सुरक्षा की बंधन

                                     देश हा समृद्धीचा

देश आपला भारत देश, कितीतरी विविधतेने नटलेला आहे,म्हणजे होता,आहे आणि पुढेही तो तसाच राहणार.खरचं मला खूप अभिमान वाटतो की, मी भारताची नागरीक आहे.आपल्या कडे निसर्ग म्हणा,संत महात्मे म्हणा की ज्ञान,विज्ञान, कला क्षेत्र म्हणा सगळ्या गोष्टीनी असा पारंगत आहे,आपला भारत देश.म्हणूनच तर परकीय देशातील लोकं आपल्या कडे आले की, अश्या विविधतेने नटलेल्या भारताकडे बघून त्यांना खूप अप्रूप वाटतं. त्यांना आपली,गाणी,सणं, पेहराव,संस्कृती याचं खूप नवल वाटतं इतकंच काय तर ते आपल्या संस्कृत भाषेतील श्लोक सुद्धा म्हणायला तत्पर असतात.इतका सुंदर आणि समृद्ध अश्या भारताला आपल्याला आणखी सुंदर आणि समृद्ध बनवायचा आहे कारण आपल्या भारतात लोकशाही असल्यामुळे सगळेच नागरिक सुजाण आहेत,त्यामुळे आपणच आपल्या भारताला समृद्ध बनवायला हवे, सुंदर बनवायला हवे. हो की, नाही बरोबर ना. आपणच ती वाटचाल सुंदर बनऊ शकू.

भारतीयासाठी दुसरा भारतीय परका नाही. ' विविधतेत एकता ' ही आपल्या देशाची हजारो वर्षांची परंपरा राहिली आहे. आपण भारतवासी आहोत म्हणजे काय आहोत? संयोगाने या देशात जन्म घेतला म्हणून केवळ आपण भारतवासी नाही. ही केवळ नागरिकतेशी संबंधित बाब नाही. भारताच्या भूमीवर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती ' भारतपुत्र ' आहे. या मातृभूमीची निस्सीम भक्ती करणे त्याचं काम आहे.

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे,भारतात भरपूर समृद्धी होती व आहे . त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी कोणाशीही संघर्ष करावा लागला नाही. स्वाभाविकच आपण या दृष्टिकोनातच वाढलो की, भारतात समृद्धी भरपूर आहे, आपण त्याचा उपयोग करत आहोत, आपले जीवन समृद्ध करत आहोत. कोणी येत आहे तर ठीक आहे, तुम्हीही या आमच्याबरोबर राहा भाषा, पंथ, संप्रदाय यांची विविधता तर पहिल्यापासूनच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत बनतात, राजकीय विचारप्रवाहांत मतभेद पहिल्यापासून आहेतच, परंतु या विविधतेत आपण सगळे भारतमातेचे पुत्र आहोत हे आधी लक्षात घ्यायला हवे आणि आपापल्या विविधतेच्या  वैशिष्ट्यांवर ठाम राहून, दुसऱ्या च्या विविधतेचा सन्मान करता आला पाहिजे.आणि त्यांनी त्यांच्या विविधतेवर ठाम राहावे या दृष्टिकोनाचे आपण स्वागत केले पाहिजे.आपण सगळेच भारतमातेचे पुत्र आहोत. आपआपली मते काहीही असोत, पण आपण हे स्वीकारून पुढे चालत आहोत की, अंतिमत: आपण सगळे मिळून भारताचे भाग्य बदलू. ' भारताला समृद्ध बनवू ' या एकाच ध्येयासाठी  वेगवेगळे रस्ते पत्करणाऱ्या लोकांनी, आपली विविधता तिच्या वैशिष्ट्यांसह घेऊन पुढे चालावयास हवे. त्याने आपले सामाजिक जीवन समृद्ध होते. विविधता असणे, हे सुंदरतेचे व समृद्धतेचे लक्षण आहे. त्याचा स्वीकार करत आपण चालत आहोत. या भावनेचे भान राखत, आपण सगळे एक आहोत, याचंही दर्शन वेळोवेळी होणे गरजेचे आहे. कोणत्याही राष्ट्राचे भाग्य बनविणारे समूह नसतात, व्यक्ती नसतात, विचार तत्त्वज्ञान नसते, सरकार नसते. सरकार खूप काही करू शकते, मात्र सगळेच करू शकत नाही. देशातील सामान्य समाज जोपर्यंत गुणसंपन्न बनत नाही, आपल्या अंतःकरणातून भेदांना तिलांजली देत नाही. मनातील सगळे स्वार्थ हटवून, देशासाठी पुरुषार्थ करावयास तयार होत नाही, तोपर्यंत देशाचे भाग्य बदलू शकत नाही.

स्वातंत्र्यापूर्वी मागास राष्ट्रांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारताने त्यानंतरच्या साठ वर्षात नेत्रदीपक म्हणावी अशी प्रगती केली आहे.देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्याकडे देशवासीयांना पुरवता येईल एवढे अन्नही नव्हते. म्हणून नंतर डॉ. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती घडविण्यात आली. त्यामुळे उत्पादन वाढले आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज दुष्काळ पडला तरी उपासमारीने गरीब मरतील अशी स्थिती नाही. हे हरीतक्रांतीचे यश आहे. म्हणूनच आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख हा वाढतोच आहे आणि तो असाच वाढत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना म्हणून म्हणेन "मेरा भारत महान"जय हिंद .


                            कायदा सुरक्षा की बंधन

एखाद्या समाजामध्ये सुरक्षेचा प्रश्न जेव्हा मोठा होतो, सामान्य नागरिकांना जिथे सुरक्षित वाटत नाही, तिथे प्रश्न हा पोलिसांचा नसून त्या समाजाच्या एकूणच स्वास्थ्याचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजाच्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे बघताना समाजाची वीण अधिक घट्ट कशी होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच कशी कमी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

भारतामधली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या श्रुंखलेमधली प्रत्येक कडी कमकुवत आहे. कायदा बनवण्यापासून, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आणि कायदा न पाळणारे आहेत त्यांना शिक्षा होईपर्यंत प्रत्येक पायरीमध्ये दोष आहेत.

भारतामध्ये जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा न करता नवीन कायदे बनविण्याकडे कल दिसतो. त्यामुळे कायदे हे कमकुवत झालेले असतात आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही. कायदेच कमकुवत असल्यामुळे गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाणही कमी होते. या सगळ्याचा एकत्रित आणि कोणत्याही शासनव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक परिणाम म्हणजे यामुळे एकूणच कायद्यावरचा विश्वास आणि न्यायव्यवस्थेवरची सामान्य जनतेची श्रद्धा कमी होते.आणि त्यामुळेच लोकं त्या कायद्याचा गैरवापर करायला पण मागे पुढे पाहत नाहीत ही आजची स्थिती झालेली आहे.

एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू कायद्याला पण असतात म्हणजे बघा ना एक बाजू चांगली म्हणता येईल तर दुसरी बाजू वाईट.म्हणजे काही वेळेला कायदा हा चांगला आणि सुरक्षित असला तरी काही वेळेला तोच कायदा काहीजणांसाठी बंधनकारक आणि असुरक्षित पण राहू शकतो.म्हणूनच कायदा जितका सुरक्षित आहे तितकाच काही वाईट लोकांच्या वागणुकीमुळे त्यालाही वाईट केलाय असे म्हणायला हरकत नाही.कायदा हा सुरक्षेसाठीच केला गेलाय पण त्याचाही काही प्रमाणात गैरउपयोग होतो त्यावेळेला वाईट वाटतं.

म्हणजे बघा कलम ४९८ अ भारतीय दंड संहिता नुसार एखाद्या स्त्रीला तिच्या नवऱ्याने किंवा त्याच्या घरच्यांनी शारिरीक किंवा मानसिक त्रास दिला तर त्याकरिता शिक्षा आहे.म्हणजे एका दृष्टीने महिलांना अशाप्रकारे त्रास झाला तर त्यांच्या संरक्षणासाठी असे कायदे करण्यात आलेले आहेत तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २००५ असा सुद्धा कायदा करण्यात आलेला आहे.या कायद्यामुळे महिलांना सुरक्षा तर मिळतेच आणि हिम्मत देखील,पण या कायद्याचा गैरवापर सुद्धा केल्या जातो अनेकदा काही महिला याचा गैरवापर करतात म्हणजे स्वतःच्या  फायद्यासाठी त्या विनाकारण स्वतःच्या नवऱ्याचा आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने देखील खोटी केस केल्या जाते.तसेच भां.द.वी. चे कलम ३७६ बलात्काराच्या सुद्धा केसेस बऱ्याच वेळेला खऱ्या असतात पण काही वेळेला इथे सुद्धा कायद्याचा दुरुपयोग केला जातो त्याचं खूप वाईट वाटतं कायदा हा सुरक्षेसाठी केलेला असताना सुद्धा जर त्याचा दुरुपयोग केला जात असेल तर त्या सारखी दुसरी वाईट गोष्ट नाही.याच गोष्टी वरून एक किस्सा आठवला,मी असाच एक लेख स्त्रियांवर लिहिला होता तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला फोन केला आणि मला म्हणाली की,क्षमा तू लेख खूपच छान लिहिलास, पण माझी तुला एक विनंती आहे की,तू एक लेख पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारा वर देखील लिही सगळेच कायदे स्त्रियांकरिता आहेत पण काही वेळेला पुरुषांना पण महिला फसवू शकतात आणि हे ऐकून मला वाईट वाटले म्हणून मी तिला विचारले असता तिने सांगितले की,तिच्या मावस भावासोबत असेच काहीतरी घडले म्हणजे त्याने त्याच्या बायकोला काहीच म्हटलेले नसताना तिने त्याला आणि त्याच्या घरच्यांना त्रास देण्याच्या हेतूने चुकीची केस केली आणि त्यामुळे तिच्या भावाला खूप मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली खूप वाईट वाटले म्हणजे बघा कायदा सुरक्षेसाठी असतो पण त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो.

नंतरच्या काळात तांत्रिक क्रांती झाली. सायबर विश्व आणखी प्रगत झाले. अलीकडील काळात व्हॉटस्अप,फेसबुक, इमेल यातून परस्परसंबंध विस्तारत गेले. अशा वेळी एका मित्राने दुसऱ्या मित्राला इमेल पाठवले, तर त्यातील मजकूर ईमेल चालवणाऱ्या कंपनीला वाचता येईल का किंवा पोलिसांना परस्पर नकळत ते शोधता येईल का, हा खाजगीपणाचा प्रश्न आला. पूर्वी आपण पत्र लिहायचो तसेच ते आता इमेल, व्हॉटस्अप, फेसबुकवर लिहितो. कंपन्या किंवा सरकार हस्तक्षेप करून ते पत्र किंवा त्यातील मजकूर वाचणार असतील तर ते खाजगी हक्का वर गदा आणण्यासारखे नाही का, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कंपन्या किंवा सरकार असे करत असल्यास त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात काहीही कारण नसताना केलेली ढवळाढवळ होत नाही का, व्यक्तींमधील संवाद, इमेलची देवाणघेवाण वाचली जाणार असेल तर ती खाजगी कशी राहाणार, असे हे प्रश्न  आहेत. तसेच हे प्रश्न उपस्थित करतानाच यासंदर्भात काही बंधने आवश्यक आहेत का,हाही प्रश्न आहेच.


काही प्रमाणात बंधने ठेवावी लागतील. 

असे असले तरी यासंदर्भात काही बंधने असावी लागतील. कारण, समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीची खोटी बदनामी करणारा मेसेज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध (आजच्या भाषेत व्हायरल) केला. तर अशा प्रकरणामध्ये सदर व्यक्तीने मागणी केल्यास हा मेसेज कुठून आला होता हे शोधण्याचा अधिकार राहील. यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा नव्हे तर स्वतःचे खाजगी आयुष्य जपण्याचा अधिकार वापरता येईल. ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये याचा समावेश होऊ शकणार नाही अशी तरतूद करावी लागेल.


दुसरी गोष्ट म्हणजे, समजा कुणी तक्रार दाखल केली नसेल, पण एखादे राष्ट्रविरोधी कृत्य केले जात असेल तर,उदाहरणार्थ, व्हॉटस्अप किंवा सोशल मीडियावरून समाजविघातक, चिथावणी देणारा मेसेज पाठवला जात असेल तर सरकारला स्वतःहूनही यामध्ये लक्ष घालता येईल. तसेच फौजदारी गुन्हा घडत असताना ती कंपनी किंवा सरकार यांना त्याचे मूळ शोधून काढण्यासाठी सर्व मेसेजेस वाचता येतील. मात्र, याचा अर्थ केलेली कृती गुन्हा आहे, विघातक आहे, दुसऱ्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे, असे आढळले तरच अशाप्रकारे शोध घेता येईल. सरसकट सर्व ई-मेल, व्हॉटस्अपच्या मेसेजेसमध्ये सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजेच खाजगी जीवनातील करार, मदार, कौटुंबिक संपर्क, खाजगी पत्रे हा व्यक्तीच्या खाजगी जीवनाचा भाग असेल आणि तो सायबर कायद्यामध्येही अबाधित राहिला पाहिजे. असे न केल्यास सामान्य माणसाचा खाजगीपणाचा अधिकार काढून घेणे होईल. थोडक्यात, एखाद्याची तक्रार असेल, कुणावर तरी अन्याय झालेला असेल, देशहितासाठी, देश संरक्षणासाठी गरजेचं असेल तेव्हा राईट ऑफ प्रायव्हसीचा अधिकार पुढे करून बचाव करता येणार नाही. अशी बंधने मान्य करावी लागु शकतात.

सायबर गुन्हे कायद्यात अचानकच एखादी व्यक्ती मेसेज पाठवतो. इमेलवरसुद्धा खोटे आयडी तयार केले जातात. त्यावरून तिसऱ्या व्यक्तीला धमकावणारा मेसेज जातो. जेव्हा न्यायालयात हा खटला येतो तेव्हा मी हा इमेल केला नव्हता असे झाले की, न्यायालय त्या इमेलच्या मुळाशी जाण्याचे निर्देश देते. मग तो कुठून आला ते शोधणे या ठिकाणी निश्चितच  परवानगीयोग्य असेल.या ना अशा आनेक घटना घडत असतात म्हणूनच जिथे गरज असेल तिथे कायद्याचे संरक्षण म्हणून उपयोग व्हायलाच हवा पण जर व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर जर घाला घालणारा समाज असेल तर तिथे काही प्रमाणात बंधने देखील आवश्यक होऊन जातात.


ऍड.सौ.क्षमा आशिष धर्मपुरीवार

बालन्याय मंडळ सदस्य

चंद्रपूर,फोन न.८४८४०८२२२४






Tuesday, November 3, 2020

नवरंग नवरात्रीचे

 बघा आवडतंय काय  👇🙏    


                           नवरंग नवरात्रीचे

मागच्या वर्षी नवरात्री मध्ये मी स्वतः नवरात्रीचे नवरंगाच्या साड्यांचे फोटो fb वर टाकून रंगाचे महत्व सांगितले होते पण यावर्षी कोरोनामुळे सगळ्यांचा उत्साहाचं मावळलाय आणि त्यातल्या त्यात सध्या ह्या cyber crime मुळे आता फोटोस टाकायची पण भीती वाटते असो पण मागच्या वर्षी फोटोस टाकले होते तर कोणी चांगले आणि कोणी वाईटही बोलले होते. या गोष्टीची खंत आहे की, स्त्री आहे म्हणून तिला मानसन्मान दयायचा नाही द्यायचा नाही तिची खिल्ली उडवायची,का बरं तिला प्रत्येक वेळेला कमीच लेखल्या जातं,खरं तर आज स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरीही स्त्रियां वरील अत्याचाराचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही.म्हणजे आज एक बलात्काराची बातमी कानावर पडली की, लगेच दोन दिवसांनी पुन्हा कुठली तरी बलात्काराची बातमी ऐकायला येते जणू काही त्या नराधमांना त्याचे कृत्य पाहून यालाच बळ येतं असं वाटतं आणि अशा बातम्या कानावर पडल्या की, तळपायाची आग मस्तकात जाते.मला ह्यातून हेच सांगावेसे वाटते की,स्त्री ही आज कुठल्या ही क्षेत्रात कमी नाही तर तिचा योग्य मानसन्मान हा व्हायलाच हवा.


खरंय देवीचे नवरात्र आले की,एक प्रकारचा आनंद,उत्साह संचारतो.आपल्या पैकी अनेक जणांना कोणता रंग कधी घालायचा त्याचा वार आणि तारीख याची यादी नवरात्र सुरू व्हायच्या आधीच आपल्याला मिळालेली असते आणि आपण त्याची सगळी तयारी देखील केलेली असते. होय ना...?

चला तर मग या वर्षी आपण सगळेच जण जरा वेगळ्याच नवरंगाची उधळण करूया तुम्हाला हे नवरंग आवडतात काय बघा


नवरंग नवरात्रीचे.


१)पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्याचा.खरंय अजूनही देश पुढारलाय पण स्त्री भ्रूण हत्या सुरूच आहे ते कुठेतरी थांबायला हवे.


२)दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा जसे मुलगा हा घराचा वंशाचा दिवा असतो तसेच मुलीला पण वशांची पणती म्हणायला काय हरकत आहे.


३)तिसरा रंग आपल्याच मुलीकडे आपण जबाबदारी म्हणून न पहाता एक मौल्यवान व्यक्ती म्हणून नक्कीच पाहू शकतो.जेणेकरून त्या मुलीला पण त्याची जाणीव होता कामा नये की ती एक जबाबदारी आहे.


४)चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करण्याच्या मानसिकतेचा ही मानसिकता प्रत्येकानेच ठेवायला हवी जेणे करून मुलगी ही स्वावलंबी झाली,स्वतः च्या पायांवर उभी झाली की,तिला कुणापुढे झुकण्याची गरज पडणार नाही.


५)पाचवा रंग स्त्रियांवरचे वरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करण्याचा.लोक स्त्रियांवर खूप व्हायात विनोद करतात आणि त्यातून तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तर हे सुध्दा चुकीचे आहे.


६)सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारिरीक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करण्याचा.अगदी खरं आता स्त्री काही कमजोर  राहिली नाही ती सुद्धा प्रत्येक बाबतीत पुढेच आहे आज स्त्री सुध्दा आपली ताकद दाखवू शकते पण शेवटी समाजाने स्त्रीच्या मानसिकतेला कमजोर करून ठेवलंय त्यामुळे ती पुरुषाच्या ताकदीसमोर कमजोर पडते इतके नक्कीच.


७)सातवा रंग स्त्री ही फक्त "स्त्री" नसून ती अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ अशी "व्यक्ती " असे म्हणायला हरकत नाही ती बाहेरचेच काम नाही तर संसार मुलबाळ सांभाळून प्रत्येक गोष्ट करीत असते म्हणूनच तर ती श्रेष्ठ असते.


८)आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी,वेश्या व्यवसाय ह्याबाबतीत अतिशय कठोर कायदे करून लवकर लवकर त्या पिडितेला न्याय मिळवून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा जेणेकरून पुन्हा असे घृणास्पद कृत्य करताना कोणत्याही पुरुषाने 10 दा विचार नक्कीच करायला हवा.


९)नववा रंग "स्त्री पुरुष समानतेचा"समाजात स्त्रियांना पुरुषाएवढाच मान सन्मान मिळायला हवा.करण अजूनही आपल्या कडे स्त्री ही कर्तृत्ववान झाली असली तरी तिथे भेदभाव हा दिसतोच आहे म्हणून स्त्री पुरुष समानता ही मनापासून स्वीकारायला हवी फक्त दिखाव्याकरिता असली स्त्री पुरुष समानता नको असायला.


शेवटी काय तर आज जर आपण चांगले वागलो तर आपली पुढची पिढी त्याला न्याय देऊ शकेल असे मला तरी वाटते.


आपण खऱ्या रंगासोबतच हे वरील रंग पाळलेत ना तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्यावर खऱ्या अर्थाने प्रसन्न होतील, आणि आपल्याला अनेक आशिर्वाद देतील आणि हाच दिवस हा विजयादशमी चा दिवस असेल होय की नाही.मग सगळ्यांकरिता प्रत्येक दिवसच हा"विजयादशमी"असेल...


मग विजयादशमी ला सोने लुटण्याची गरजच भासणार नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच होईल नाही का.मुलीला मुला प्रमाणे वागणूक द्या भेदभाव करू नका.

मुलगी का नकोशी वाटते हो...? जर मुलगीच नसती तर आपल्याला आई,बहीण,बायकोआत्या,मावशी, काकू,आजी मिळाली असती का...?बरोबर ना मग खरंच विचार करा स्त्री भ्रूण हत्या थांबवा,महिलांवर अत्याचार थांबवा हीच खरी घटस्थापना आणि नवरात्र असेल सगळ्यांकरिता.


चला तर मग या वर्षीचे कोरोनाच्या काळातील नवरात्र आणि विजयादशमी वरील नऊ रंगाचा संकल्प करून साजरी करूया.


ऍड. क्षमा बासरकर- धर्मपुरीवार

अध्यक्ष बाल कल्याण समिती,चंद्रपूर

8484082225

Monday, November 2, 2020

स्त्री मनातील स्त्री (स्त्री मन )

                               स्त्री मनातील स्त्री

                                  (स्त्री मन )


फेसबुक वर  माहेरचा कट्टा हा जो प्लॅट फॉर्म सुरू केलाय महिलांकरिता तो खूप छान माहिती पुरविणारा ग्रुप आहे. पण त्यातही काही महिलांनी जे काही अनुभव म्हणा किंवा समस्या म्हणा मांडल्या किंवा व्यक्त केलाय त्यावरूनच मी हा लेख लिहिलायं कारण स्त्रिया ह्या कितीही स्वतंत्र झाल्या असं म्हटलं जातं पण त्या पूर्णपणे स्वतंत्र झाल्या काय हो वाटतं काय तुम्हाला असं आणि म्हणूनच मग  या महिला दिनाच्या निमित्ताने हा लेख लिहावासा वाटला.


खरं तर हा लेख मी खूप आधीच लिहिलेला होता आणि तो परिचयातील लोकांना पाठविला पण पुरुष मंडळी कडणं negative कंमेंट्स मिळाल्या. म्हणजे त्यांना असे वाटले की,मी माझा अनुभव शेअर करते आहे पण हा चुकीचा समज त्यांनी करून घेतला म्हणजे समाजात चाललेल्या चालू घडामोडींवर आपण नाही लिहू शकत काय पण नाही समाजात चुकीचा आणि नकारार्थी विचार करणारे बरेच लोक आहेत ना,मला खूप वाईट वाटले हे सगळे बघून म्हणजे मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री मन जाणण्याचा च प्रयत्न केला तर कुठे चुकले माझे, म्हणजे मी स्त्री  मनातली स्त्री जाणण्याचाच प्रयत्न केला होता ना.त्यात काय वावगं आहे.

                  

   "बंदिनी स्री ही बंदिनी हृदयी पान्हा नयनी पाणी,जन्मोजन्मीची कहाणी बंदिनी स्त्री ही बंदिनी"           


  महिला,नारी, स्त्री असे अनेक नावाने ओळखली जाणारी स्त्री तिला कधी जगात खूपच मान सन्मान दिल्या जातो तर कधी तिला अगदीच वाईट वागणूक दिली जाते हे आताचच नाही तर हे पूर्वीपासूनच चालत आलय ,पण काळ बदलला सावित्रीबार्इ फुले, रमाबार्इ रानडे, आनंदीबार्इ गोपाळ या सारख्या महिला समाज सुधारकांनी पुढारकार घेउन स्त्रीला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. शिक्षण देऊन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. तिच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांनी केलेल्या महिला शिक्षण चळवळीचा स्त्रियांना फायदा झाला आणि महिला कर्तुत्ववान व कर्तबगार झाल्या. पण आता स्त्री शिकली,पूढे चालली तरी ही समाजात तिला म्हणावा तसा वाव मिळत नाही,का? हाच माझा खूप मोठा प्रश्न आहे का तर ती स्त्री आहे म्हणून पुरुष हा शक्तीशाली असतो,त्याला समाजात स्त्रिया पेक्षा जास्त वाव आहे म्हणून, पण सगळेच पुरुष परिपूर्ण नसतात जसे स्त्रिया घरातले, बाहेरचे दोन्ही काम,आपला संसार ,मुलबाळ सांभाळून करू शकतात तसे सगळे पुरुष नाही करू शकत तरीही स्त्री ही कमजोर आहे असे समजल्या जातं,अरे तुम्ही तिला प्रोत्साहन द्या,तिला पुढे जाऊ द्याल तर अबला स्त्री सुद्धा सबला होऊ शकते,पूर्वीच्या काळी सावित्री बाई फुले,झांशी ची राणी या पण स्त्रियाच होत्या पण त्यांनी पण पुढे होऊन बरेच कर्तृत्ववान कामे केलीत ना इतकी उदाहरणं डोळ्यासमोर असताना सुद्धा अजूनही या कलीयुगात स्त्री ला कमजोर समजल्या जातं, मला असे म्हणायचे नाही की तिला सन्मान दिल्या जात नाही,मग मी आता बऱ्याचदा social media वर बघते तर प्रत्येक वेळेला स्त्री वरून जोक्स आणि काही वाईट गोष्टी लिहिल्या जातात बरेचदा स्त्रियांचे फोटो अपलोड केले जातात की,स्त्री च्या हातात मोबाईल  फोन असतो मुलगा खिशात असतो किंवा असे काहीतरी वायफळ पोस्ट टाकून स्त्री ला कमी लेखल्या जातं म्हणजे तिचं हस केलं जातं ती सतत wtsap आणि मोबाईल वर असते असे दाखवल्या जातं, म्हणजे स्त्रियांनी social media चा वापर करणे गुन्हा आहे काय?हं  पण मी हे पण म्हणींन की  त्याचा ज्यादा अतिरेक पण नको,पुरुष तर ह्याच्या दुप्पट इंटरनेट चा वापर करतात सतत wtsap, fb वर असतात मग त्यांनी त्याचा ज्यादा उपयोग करणे चांगले काय? कित्येकदा मी ऐकते बायकांची कुजबुज चाललेली असते अगं हे घरी आले की, ना सतत मोबाइल घेऊन असतात,जेवताना सुद्धा मोबाईल हातात असतो मग हे चालतं काय? अरे घरी आल्यावर तरी निदान आपल्या बायका पोरांना वेळ द्या त्यांच्या शी मनमोकळं बोला जर तुम्ही असं केलत तर बायका मुलं काय करतील मग घरात सगळे मोबाइल घेऊनच बसतील कुणाचा कूणाशी संवाद प्रकारचं राहणार नाही ,तसेच ह्या पण गोष्टी बऱ्याचदा वाचायला मिळतात की, घरात खूप अपमानास्पद वागणूक मिळते,नवऱ्याचं कुठेतरी बायको मुलं असताना सुद्धा बाहेर दुसऱ्या बाई बरोबर अफेअर असतं, असे वागून त्यांना काय मिळणार असतं नुसता संसार उध्वस्त करणे बाकी काही नाही.मग बायका म्हणतात की मुलांकडे बघून चूप बसावं लागतं पण का म्हणजे माणसाने काही केले तरी स्त्री ने मूग गिळून चुपचाप बसायचे, का तर पुन्हा तोच प्रश्न ती एक स्त्री आहे म्हणून पण मग जी त्या पुरुषाला आपल्या नादी लावते ती पण तर एक स्त्रीच असते ना,मग तिला नाही कळत काय की, आपण कुणाचा तरी संसार उध्वस्त करतोय ते,ती एक मालिका असचं एक कथानक असलेली  झी मराठी वर सुरू आहे "माझ्या नवऱ्याची बायको" अश्या मूर्खा सारख्या सिरीयल काढून अजून पुरुषांना जोर चढतो, आता तर कहरच झाला आहे बघितले ना ते "बिग बॉस" मधले प्रकरण किती shameful,तसेच  नौकरी करणाऱ्या स्त्रियांना खूप मान मिळतो घरात, का तर ती पैसे आणते कमवून म्हणुन,मग जर एखादी स्त्री नौकरी नसेल करत तर तिला काहीच किंमत नाही काय,अरे घर सांभाळणे सुद्धा एक मोठी जबाबदारी च आहे ना अहो,एक साधी गृहिणी जरी ऑफिस ला जाऊन पैसे कमवत नसली ना तरी ती उत्तम प्रकारे घर खर्चाचे नियोजन करत असते,एखादया महिन्यात कमी पैसे असले तरी घरात ती कोणाला काही कमी पडू देत नाही,तिला कधीच कमी लेखू नका कारण तुमच्या घरातली खरी अर्थमंत्री एक गृहिणीच असते.आणि ती सगळे यशस्वी पणे पार पाडतेच की, मग तिला  कमी दर्जा का दिला जातो,तसेच काही मैत्रीणीं कडून हेही ऐकायला मिळाले की आता या social media, wtssp मूळे वगैरे जुने शाळेचे ग्रुप्स वगैरे तयार केले जातात त्यातून पुन्हा जुने मित्र मैत्रिणी एकत्र येतात तर त्यातही भेदभाव होतो म्हणजे नवऱ्याने त्याचा ग्रुप किंवा त्याच्या मैत्रिणी शी संपर्क ठेवायचा पण तोच जर बायको अर्थात स्त्री  चा ग्रुप असेल तर तो मात्र नवऱ्याला अर्थात पुरुषाला पटत नाही का तर ती तुमची बायको आहे म्हणून,मग ती तुमची मैत्रीण पण कुणाची तरी बायको,आई,सून,मुलगी असेलच ना आणि तीच गोष्ट त्या स्त्री ला सुद्धा लागू होते जुन्या ओळखी असतात मान्य ना पण त्या पुरुषाचं सुद्धा लग्न झालेलं असतं मग तो पण कुणाचा तरी नवरा,बाबा,जावई,मुलगा असतोच ना मग असा भेदभाव का केल्या जातो,अजूनही स्त्रीच स्त्रीला समजून घेऊ शकली नाही आहे, काल परवाच facebook वर एक माहेर चा कट्टा नावाचा ग्रुप आहे त्यावर एकीने प्रश्न विचारला होता की कोणा कोणाला सासूबाई आवडतात तर त्यावर बऱ्याच मुलींनी नकारार्थी उत्तर दिलीत का तर सासू बाई मुलीला सगळं विचारून करतात,मुलीला घरात जास्त भाव असतो सुनेला विचारले जात नाही मग असं का केल्या जातं अहो ती आलेली सून पण तर कुणाची तरी मुलगीच असते ना तुमच्या मुलीला तुम्ही तिच्या सासरी पाठवलीत ना मग तिच्या घरी तिला किती लुडबुड करायची ती करू देत ना,पण तुमच्या घरात तुमची सून आल्यावर तिला सोबत घेऊन तिलाच आपली मुलगी मानून चला ना,बघा बरं घरात किती आनंद असेल तर,म्हणजे सुनेने पण सासूबाईला आई सारखं पाहावं आणि सासूबाईंने देखील सुनेला मुलींसारखं पाहावं,मुलाने सुनेच ऐकलं की तो बायकोच्या म्हणण्यात आहे असे मुलांच्या आईचे म्हणणे असते मग तेच मुलीचा नवरा सगळं ऐकत असेल तर  माझा जावई ना खूपच चांगला आहे हो,तो ना माझ्या मुलीचे सगळे ऐकतो आणि इथेच तर तुमचा बायकानं मध्ये किती भेदभाव होतो ते दिसतं.आताच चंद्रपूरला मध्ये मुली विकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आणि एकूण काटाचं आला कारण त्या मुलींना विकणाऱ्या सुद्धा स्त्रियाच होत्या म्हणजे बघा ना स्वतः त्या स्त्रिया असून त्यांनी त्या मुळीच दुःख समजून घ्यायला हवे होते ना कोवळ्या कोवळ्या मुलींना त्यांच्या वयापेक्षा 10 ते 15 वर्ष मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला लग्न करण्यासाठी विकतात बरं इतक्यावरच थांबतात काय हे लोक नाही लग्न करून त्या माणसाची भूक शांत झाली की त्याच मुलीला दुसऱ्या व्यक्तीला विकल्या जायचे किती तो किळसवाणा प्रकार म्हणजे त्या मुलीला एखाद्या बाईला आपल्या मनातलं बोलून दाखवावं असे वाटलेयी असेल कदाचित पण इथे विकणाऱ्याच स्त्रिया होत्या मग त्या स्त्रियांनी त्या मुलीचं दुःख समजायला नको होते काय पैशासाठी स्त्रीच स्त्री ला विसरते. 

कधी कधी खरंच असं वाटतं की,स्त्रीच स्त्री च दुःख समजून घेत नाही.आता मी सासू सुनेचे उदाहरण दिलेच आहे पण असेच ज्या "विधवा" स्त्रिया असतात त्यांच्या बाबतीत पण बरेचदा वाईट अनुभव बघायला मिळतात. म्हणजे नवरा स्वर्गवासी झाला की,त्या बाईला कुठेच म्हणजे सवाष्ण बाईला जे करू दिल्या जातं ते तिला करू दिल्या जात नाही. तिने काळीच टिकली किंवा कुंकू लावायचे लाल टिकली किंवा कुंकू लावायचा नाही असा पूर्वी समज असायचा,तिने हिरव्या बांगड्या,मंगळसूत्र पण घालता येत नाही अशी आणि बरीच बंधन त्यांच्यावर येतात,पण असे का?हा माझा सगळ्याच स्त्रियांना प्रश्न आहे.अरे, त्या स्त्रीचा काय दोष जर तिच्या नवऱ्याचं निधन झाले असेल तर, कारण त्या व्यक्तीचे आयुष्यचं तेवढं असेल तर ती स्त्री तरी काय करू शकते तीची त्यात काय चूक ना! म्हणजे विधवा होणं गुन्हा आहे काय हो?ज्या स्त्री चा नवरा तिला सोडून स्वर्गवासी होतो तेच तर किती मोठं दुःख असतं त्या बाईला आणि त्यात हा समाज असे बंधनं घालून अजून तिचं मन दुखवतो.मग अशावेळेला स्त्री नेच स्त्री ला समजून  घ्यायला हवे ना?मग का तिला समजून घेतल्या जात नाही खुप वाईट वाटतं सगळे बघितले की,असं आपल्या समाजात घडायला नको कारण स्त्रिया ह्या तरुण वयात ही विधवा होतात आणि आपण तर आता बघतोच आहे स्त्री एकटी दिसली की, कसे स्त्रियांचे लचके तोडल्या जातात आणि ह्या जगात एकटी स्त्री म्हटलं की,हजार वाईट नजरा तिच्या कडे बघतचं असतात मग अश्या वेळेला त्या विधवा स्त्री ने लाल कुंकू लावले,गळ्यात मंगळसूत्र घातले तर काय वाईट आहे हो,ती तिच्या बचावासाठी इतकं तर करूच शकते ना, शकुन अपशकुन हे सगळं थोतांड असतं हो, अहो आता आपण २१ व्या शतकात जगतोयं तर आतातरी आपले विचार बदलायला हवेत.आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे स्त्री ही पुरुषांप्रमाणे सगळी कामे करू शकते.आत्ताचच उदाहरण घ्या ना, लेफ्टिनेंट जनरल माधुरी कानिटकर ही देशाची  तीसरी महिला लेफ्टिनेंट जनरल बनली आहे किती अभिमानाची बाब आहे स्त्रियांकरिता आणि त्यांचे पति राजीव पण लेफ्टिनेंट जनरल पदावर आहेत हे असे पाहिल्यांदा झाले आहे की,पति पत्नी दोघेही ३ स्टार होल्ड करणारे लेफ्टिनेंट जनरल पदावर आहेत.सुनीता विलियम सारखी स्त्री चंद्रावर जाऊन येते तरी आपला समाज मात्र मागासलेलाच आहे.

        अहो जग इतक पुढे चाललंय मग अजूनही स्त्री ला का समजून घेतलं जात नाही,तिच्या मनाचा विचार का केला जात नाही,हो कारण एकच ती एक स्त्री आहे म्हणून, नका हो असा अत्याचार करू तसं म्हटलं तर काही ठिकाणी म्हणजे साधारण आणि गरीब घरांमध्ये स्त्री वर अत्याचार होतो पुरुष मारतो वैगरे तर ते दिसून पडतं पण उचभ्रू कुटुंबा मध्ये मानसिक रित्या छळ होतो पण ते बाहेर दिसून पडत नाही अशाप्रकारे समाज अजूनही पूर्णपणे पुढे गेलेला नाही,माझा म्हणणं इतकचं आहे की, स्त्रीचं मन समजून घ्या , तिला कमी लेखू नका.आणि म्हणूनच पुरुषांप्रमाणे स्त्री ने सुद्धा स्त्रीला समजून घ्यायला हवे कारण वेळ आली तर तीच स्त्री दुर्गा आणि चंडिकेचे रूप घेऊ शकते हेही विसरू नका तिला कमजोर समजू नका.


२१ व्या शतकात देखील समाजात स्त्रीचे स्थान खचितच मोठे आहे व मोठेच राहील यात तीळमात्र शंका नाही.म्हणूनच स्त्री ही महानच असते.


आयुष्याच्या घरट्या मघुनी

जीवनाचे सूर साधते

जगते, जगवीते

प्रेमाचे धागे जुळवीते

म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते .


सप्तपदीची सात पाऊले

सात वचने विश्वासाची

अंगारून येते मम गृहा

माप ओलांडुनी तुझे माझ्यात

सामावुन घेते

म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते .


अर्धागिनी, गृहस्वामीनी

कूलवधु, भावी माता

प्रेमाची परिभाषा, विश्वासाची आशा

-हृदयाचे धागे जुळवुनी

बीज उदरी जोपासते

कूलदीपक जीवन आशा तेववीते

म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते.


सौ. क्षमा बासरकर धर्मपुरीवार

सदस्य, बाल न्याय मंडळ,चंद्रपूर

8484082224

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व…

एका चिमणीने शिकवलेलं मातृत्व… काही प्रसंग आयुष्यात असे घडतात की ते आपल्याला निसर्ग, प्रेम, माया आणि कर्तव्य यांचा खरा अर्थ शिकवून जातात. आमच...